भारतात मानवावरील कोव्हॅक्सिन चाचणी प्रक्रिया सुरू

Last Updated: Jul 15 2020 1:34AM
Responsive image


पाटणा : वृत्तसंस्था

देशातील पहिली कोरोना व्हॅक्सिन (कोव्हॅक्सिन) तयार करणार्‍या भारत बायोटेक कंपनीने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसमवेत मानवी चाचणीची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्याची ही चाचणी असून, यांतर्गत देशभरातील 14 शहरांमध्ये वेगवेगळ्या 1,500 स्वयंसेवकांना सहभागी करून घेण्यात आले आहे. 

या टप्प्याचे ‘सेफ्टी अँड स्क्रीनिंग’ असे नामकरण करण्यात आले असून, व्हॅक्सिनचे साईड इफेक्ट तर नाहीत तसेच लिव्हर आणि कोरोनावर ती नेमका कसा परिणाम करते, हे या टप्प्यात तपासले जाईल.

‘आयसीएमआर’च्या ज्येष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या ट्रायलमध्ये व्हॅक्सिनचा डोस कमी प्रमाणात वापरला जाईल. एक नवा संकेतही या टप्प्यात अंतर्भूत करण्यात आला आहे. स्वयंसेवकांची अँटिबॉडी टेस्ट घेतली जाणार आहे. जेणेकरून स्वयंसेवकांमध्ये भविष्यात कोरोना संक्रमणाचा धोका आहे की नाही, ते ठरविले जाईल. तद्नंतर त्यांना चाचणीत सहभागी करून घ्यायचे की नाही, ते ठरविले जाईल. 

नवी दिल्ली, चेन्नई, पाटणा, कानपूर, गोवा, गोरखपूर, भुवनेश्वर, रोहतक, विशाखापट्टणम, हैदराबाद आदी 14 शहरांतून ट्रायलचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. पाटणा येथे 18 ते 50 वयोगटातील 10 स्वयंसेवकांची निवड झाली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी होईल. अहवाल योग्य असेल तर पहिला डोस दिला जाईल. त्यानंतर डॉक्टरांचा चमू 2-3 तास रुग्णांवर देखरेख ठेवले आणि नंतर स्वयंसेवकांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. दुसरा डोस यानंतर 14 दिवसांनी दिला जाईल. पाटणा एम्सचे डॉ. सी. एम. सिंह यांनी ट्रायलमध्ये तपासणीसाठी सहभागाचे आवाहन केले होते. त्यावर 50 हून अधिक जणांनी तयारी दर्शविली आहे.