Thu, Jan 28, 2021 20:57
भारतातही कोरोना लसीकरण लवकरच

Last Updated: Dec 05 2020 1:47AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोना प्रतिबंधक लस आता अंतिम टप्प्यात असून लसीकरणाच्या व्यापक मोहिमेसाठी सर्व राज्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत बोलताना केले. शास्त्रज्ञांनी मान्यता देताच भारतात कोरोनाचे लसीकरण सुरू केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

लोकसभा आणि राज्यसभेच्या विविध पक्षीय खासदारांसोबतच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता. ब्रिटन, रशिया, इटली, अमेरिकेपाठोपाठ भारतातही लवकरच लसीकरण सुरू होईल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. सरकारने देशपातळीवर एक समिती बनविली असून त्यात केंद्र, राज्य सरकारमधील लोक तसेच आरोग्य क्षेत्रातील संबंधित लोक सामील आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताने एक राष्ट्र म्हणून चांगले काम केले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

मोदींचे पाच महत्त्वपूर्ण मुद्दे :

1) नि:संशय यश मिळणार
भारतीय वैज्ञानिक लसीच्या यशाबद्दल आश्वस्त आहेत. कमी किंमत आणि अधिक परिणामकारक असलेल्या लसीवर जगाचे लक्ष आहे. अवघे जग त्यासाठी भारताकडे बघते आहे. अहमदाबाद, पुणे आणि हैदराबादेत जाऊन लसीची तयारी मी स्वत: पाहून आलो आहे. भारतात उत्पादन सुरू असलेल्या 3 भारतीय लसींसह एकूण 8 लसी अंतिम टप्प्यात आहेत.

2) आता प्रतीक्षा संपली
लसीसाठी आता आपल्याला फार वाट बघावी लागणार नाही. प्रतीक्षा जवळपास संपली आहे समजा. पुढील आठवड्यात लस तयार झालेली असेल. शास्त्रज्ञांकडून हिरवा झेंडा मिळताच भारतात लसीकरण सुरू होईल. पहिल्या टप्प्यात कुणाचे लसीकरण होईल, यावर केंद्र सरकार राज्यांच्या सल्ल्याने काम करेल. हेल्थकेअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर, आजारी वृद्धांना प्राधान्य असेल.

3) अन्य देशांहून आम्ही पुढे
वितरणाबाबत केंद्र आणि राज्ये मिळून काम करत आहेत. अन्य देशांच्या तुलनेत आमच्याकडे लसीकरणाचे सर्वांत मोठे व सशक्त नेटवर्क आहे. कोल्ड चेनही मजबूत करण्यासाठी आम्ही कंबर कसली आहे. कोरोना लसीशी संबंधित सगळी माहिती लाभार्थ्यांना मिळू शकेल, असे विशेष सॉफ्टवेअर आपण तयार केले आहे.

4) दराबाबत निर्णय बाकी
लसीची किंमत काय असेल याबाबतही केंद्र राज्यांशी चर्चा करत आहे. निर्णय सार्वजनिक आरोग्याला डोळ्यासमोर ठेवूनच घेतला जाईल. भारतात तपासण्या वाढल्या आहेत आणि सुधारणेचा दर हा उत्तम आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाविरुद्ध अधिक यशस्वी मुकाबला केला आहे.

5) अफवांपासून सावधान
आम्ही अन्य देशांना मदतही करणार आहोत. आपण आता लसीकरणाच्या तोंडावर उभे आहोत. भारतातील लसीकरण अभियान हे व्यापक असेल. स्वाभाविकपणे काही शक्ती अफवा पसरविण्याचे काम करतील. लोकांनी विशेषत: सर्व जबाबदार राजकीय पक्षांनी त्यापासून सावध राहिले पाहिजे.