Mon, Jun 01, 2020 04:07होमपेज › National › ‘तबलिगी’मुळे झपाट्याने पसरला कोरोना, केंद्राची माहिती

‘तबलिगी’मुळे झपाट्याने पसरला कोरोना, केंद्राची माहिती

Last Updated: Apr 01 2020 7:05PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

कोरोना संक्रमित रुग्णांची देशभरातील संख्या १६३७ वर पोहोचली असून मागील चोवीस तासांत रुग्ण संख्येत ३८६ ने वाढ झाली असल्याची माहिती केंद्र सरकारकडून बुधवारी देण्यात आली. दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे रुग्ण संख्येत अतिशय वेगाने वाढ झाल्याचेही आरोग्य खात्याचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

कोरोनाने आतापर्यंत ३८ लोकांचा बळी घेतला असून १३२ लोक उपचाराअंती बरे झाले आहेत, असे सांगून अगरवाल पुढे म्हणाले की, मागील चोवीस तासांत रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली, याचे कारण म्हणजे जमातच्या लोकांनी देशभरात केलेला प्रवास व कोरोनाप्रती न घेतलेले गांभीर्य हे होय. जमातच्या १८०० लोकांना ९ रुग्णालये व क्वारंटाईन केंद्रांमध्ये पाठविण्यात आले आहे. गेल्या काही तासांत रुग्ण संख्येत झालेली वाढ ही राष्ट्रीय ट्रेंड दाखवित नाही, असा दावाही अगरवाल यांनी केला.

दरम्यान, रेल्वेने आपल्या २० हजार डब्याचे रूपांतरण आयसोलेशन व क्वारंटाईन बेडमध्ये करणे सुरू केले आहे. सुमारे ३.२ लाखाची बेड क्षमता निर्माण करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. प्रारंभिक टप्प्यात पाच हजार डब्यात काम सुरू करण्यात आले आहे. टेस्टिंग किटस, औषधे, मास्क आदींची वाहतूक करण्यासाठी विशेष विमाने सुरू करण्यात आली आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची लगोलग प्राथमिक तपासणी करण्याचे निर्देश सरकारने याआधीच दिलेले आहेत.