Mon, Jun 01, 2020 03:28होमपेज › National › .... अन्यथा विनाशाच्या उंबरठ्यावर!

.... अन्यथा विनाशाच्या उंबरठ्यावर!

Last Updated: Mar 28 2020 3:31PM
अभ्युदय रेळेकर

कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. परदेशातून आलेल्या कोरोनाबाधितांच्याबरोबर आता परदेशात न गेलेल्या लोकांच्याही चाचण्या पॉझिटीव्ह येत आहेत. कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याने अशा प्रकारे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता, तसेच त्यांच्यातील प्रसार पाहता मोठ्या प्रमाणावर काळजी घेणे गरजेचे आहे. 

कोरोनाचा प्रसार हा कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्यावर होतो. कोरोनाचा विषाणू हा भारतात परदेशातून आला. त्यामुळे परदेशातून आलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी करण्यात आली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. क्नारंटाईन म्हणजे स्वतःला समाजापासून अलग करणे. जेणेकरुन जर कोरोनाची लागण झाली असेल तर ती इतरांना होऊ नये. तसेच काही लक्षणे दिसल्यास तपासणी करुन वेळीच उपचार करणे सोपे होते. आता यामध्ये लोकांनी अत्यंत काळजीपूर्वक सहकार्य करणे गरजेचे असते. तसे सहकार्य प्रशासनाच्या सूचनेनुसार होताना दिसले नाही. क्वारंटाईनचा शिक्का मारलेले अनेकजण बाहेर फिरताना आढळले. तसेच निष्काळजीपणे काहीजण समुहभोजन, पार्टी करताना आढळले. त्याचा विपरित परिणाम व्हायचा तोच झाल्याचे आता दिसून येत आहे. परदेशातून आलेल्या काही नागरिकांच्याबरोबरच परदेशाचा संबंध नसलेल्या काही नागरिकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे. यामध्ये परदेशी जाऊन आलेल्या कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबातील सदस्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. 
कोरोनाच्या नाकाबंदीसाठी सुरुवातीला काही जिल्हे बंद करण्यात आले. त्यानंतर काही राज्ये बंद करण्यात आली. मात्र त्याचा काही जास्त परिणाम झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. एक दिवसासाठी पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्युचे आवाहन केले. त्यानुसार देश एक दिवसासाठी संपूर्णपणे स्तब्ध झाला. मात्र त्याच दिवशी अत्यावश्य सेवा देणाऱ्यांना सलाम करण्याच्या अनुषंगाने लोकांनी गर्दी केली. काही ठिकाणी रस्त्यावर घोळक्याने उतरुन लोकांनी थाळीनाद केला. मात्र यामुळे मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला. लोकांनी एकत्र येऊ नये रस्त्यावर फिरू नये. जेणेकरुन कोरोनाचा प्रसार होणार नाही. पण लोकांनी नको तेच केले. त्यातून पुन्हा संपूर्ण देश २१ दिवसांच्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. तरिही लोकांना कोरोनाचे गांभिर्य कळले नसल्याचेच दिसून येत आहे. लोक विनाकारण किंवा गंमत म्हणून रस्त्यावर येताना दिसत आहेत. त्यांच्यावर प्रशासनाचा बडगा उगारण्यात येताना दिसत आहे. मात्र बाहेर फिरून आपण आपल्या पायावर दगड मारुन घेत आहोत. हे जनतेच्या अजूनही लक्षात येत नाही ही बाब गंभीर आहे. 
कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची साथ तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये याचा प्रयत्न सरकार कठोर पावले उचलून करत आहे. मात्र त्याला गांभिर्य नसणारे लोक हरताळ फासत आहेत. परिणामी अलिकडच्या काळातील कोरोनाची लागण पाहता त्याचा सामाजिक अंतर न राखल्याने प्रसार झाला आहे, असेच म्हणावे लागेल. अजूनही वेळ गेलेली नाही. लोकांनी विनाकारण घराबाहेर न पडता घरीच राहून प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. अत्यावश्यक सुविधांचाही काटकसरीने वापर केला पाहिजे. तसेच अत्यावश्यक सुविधा मिळवताना कुठेही कोरोनाचा 'कम्युनिटी स्प्रेड' होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तरच कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश येईल.
कोरोनाचा चीनमध्ये पहिला रुग्ण सापडल्यापासून आता तीन महिने उलटून गेलेत. आत्ता म्हणजे २८ मार्च २०२० दुपारी २ वाजून ५० मिनिटापर्यंत जगभरात ६००८३५ कोरोनाग्रस्त आहेत. तर २७४१७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. १३३४२६ लोक कोरोनापासून मुक्त झालेत. वर्ल्डोमीटरची ही संपूर्ण आकडेवारी आहे. मिनिटामिनीटाला जसजशी माहिती मिळेल तशी ही आकडेवारी अपडेट होत आहे. त्यामुळे हा लेख पूर्ण करुन तुमच्या हाती देताना म्हणजे दुपारी ३ वाजून २५ मिनीटापर्यंत ही आकडेवारी

कोरोनाग्रस्त जग - ६,०२,१६०

कोरोनाग्रस्त मृत्यू - २७४६८ 

बरे झालेले कोरोनाग्रस्त - १,३३५२७


वरील आकडेवारी पाहिली तर किती वेगाने कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय याचा अंदाज येतो. 
आज भारताचा आणि त्यातल्या त्यात राज्याचा विचार करता. जगाच्या तुलनेत कोरोनाच्या चाचणीची व्यवस्था खूपच कमी प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्याकडे कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी दिसत आहे. मात्र जसजशी चाचणीची सुविधा वाढत जाईल. लोकांची मोठ्या प्रमाणात चाचणी होईल. त्यावेळी हे आकडे भारतात तसेच महाराष्ट्रात खूपच मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिेसेल. त्यामुळे याचे गांभिर्य आताच ओळखणे गरजेचे आहे. सावध ऐका पुढच्या हाका असे म्हटले जाते. ही आकांताने मारलेली काळजी आणि खबरदारी घेण्याची हाक जर आपण ऐकली नाही, तर न भूतो न भविष्य ती अशा विनाशाचा सामना एका विषाणूमुळे आपल्याला करावा लागेल. ही धोक्याची घंटा प्रत्येकाने ऐकावीच अशी आहे. अन्यथा विनाश अटळ आहे.