Thu, Mar 21, 2019 09:02होमपेज › National › थरूर यांच्या ‘हिंदू पाक’ वक्‍तव्याचे पडसाद

थरूर यांच्या ‘हिंदू पाक’ वक्‍तव्याचे पडसाद

Published On: Jul 12 2018 6:23PM | Last Updated: Jul 13 2018 12:29AMनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान मोदी आणि भाजपाचा द्वेष करण्याच्या नादात काँग्रेसने आता लक्ष्मणरेखा ओलांडली आहे. द्वेषात ते एवढे आंधळे झाले आहेत की देशातील हिंदूंचा आणि लोकशाहीचा त्यांनी अपमान केला आहे. भारताचे रूपांतर हिंदू पाकिस्तानात होईल, या शशी थरूर यांच्या विधानाने काँग्रेसचा खरा चेहरा उजेडात आला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अन्यथा काँग्रेसच्या सात पिढ्यांना या विधानाचा सामना करावा लागेल, असा घणाघात भाजपाचे मुख्य प्रवक्‍ते डॉ. संबित पात्रा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. 

दरम्यान, हे आपले वैयक्‍तिक मत असून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नसून आपण विधानावर कायम असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार शशी थरूर यांनी केरळमधील तिरुअनंतपूरम येथे 2019 साली पुन्हा भाजपा सत्तेत आल्यास भारताचे रूपांतर हिंदू पाकिस्तानात होईल, असे वादग्रस्त विधान केले.

पत्रकार परिषदेत डॉ. पात्रा म्हणाले की, 2019 साली पुन्हा भाजपा सत्तेत आल्यास भारताचे रूपांतर हिंदू पाकिस्तानात होईल. असे अत्यंत बेजबाबजदार विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपाचा द्वेष करण्याच्या नादात काँग्रेस आता देशातील लोकशाहीचा आणि हिंदू समाजाचा अपमान केला आहे.