Sat, Dec 14, 2019 08:44होमपेज › National › सीबीएसईचा पॅटर्न बदलणार; तर्कशक्तीवर भर

सीबीएसईचा पॅटर्न बदलणार; तर्कशक्तीवर भर

Last Updated: Dec 03 2019 1:38AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सेंट्रल बोर्ड ऑफ एज्युकेशनकडून (सीबीएसई) दहावी तसेच बारावीच्या परीक्षांची पद्धत आगामी शैक्षणिक वर्षापासून बदलण्यात येणार आहे. पाठांतराची परंपरा संपुष्टात आणण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवणता आणि तर्क करण्याची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सोमवारी  एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

खासदार किशोरी देवी तसेच चिराग पासवान यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या सीबीएसई पॅटर्नबाबत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात निशंक यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, सीबीएसईच्या दहावी तसेच बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 32 लाख आहे. प्रत्येक विषयाचे आंतरिक मूल्यांकन विद्यार्थ्यांना करता यावे, यासाठी अशा पद्धतीच्या प्रश्नांचे प्रमाण वाढविले जाईल. पहिल्या क्रमांकाच्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची संख्या 25 टक्के असेल. एकूण प्रश्नांच्या 33 टक्के प्रमाणात विद्यार्थ्यांना आंतरिक पर्याय दिले जातील. प्रत्येक विषयाच्या आंतरिक मूल्यांकनाला 20 टक्के गुण देण्यात येतील. अर्थात, ज्या विषयांमध्ये प्रॅक्टिकल होत नाहीत, असेच हे विषय असतील.