Sat, Oct 24, 2020 23:08होमपेज › National › ‘ब्राह्मोस’ची आणखी एक चाचणी यशस्वी 

‘ब्राह्मोस’ची आणखी एक चाचणी यशस्वी 

Last Updated: Oct 19 2020 12:41AM
चेन्‍नई : वृत्तसंस्था

‘ब्राह्मोस’ या भारताच्या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचणीची आणखी एक फेरी रविवारी सकाळी यशस्वीपणे पार पडली. चेन्‍नई येथे नौसेनेच्या स्टिल्थ डिस्ट्रॉयर जहाजावरून (शत्रूचे रडार याला पकडू शकत नाही) अरबी समुद्रातील एका लक्ष्याचा अचूक भेद ‘ब्राह्मोस’ने केला.

‘ब्राह्मोस’चा वेग ताशी 3,457 आहे. मारक क्षमता 400 कि.मी.पर्यंत आहे. भारत-चीन सीमेवरील तणावाची स्थिती बघता संरक्षण क्षमता वाढवण्याच्या दिशेने भारताचे विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. ‘ब्राह्मोस’ची चाचणी हा त्याचाच एक भाग आहे.

‘ब्राह्मोस’च्या अचूक लक्ष्यभेदाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘डीआरडीओ’, ‘ब्राह्मोस’ आणि भारतीय नौदलाचे अभिनंदन केले आहे. यापूर्वी ‘संरक्षण संशोधन आणि विकास’ने (डीआरडीओ) ओडिशाच्या चांदीपूर येथे 30 सप्टेंबरला ‘ब्राह्मोस’ सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. 

2005 मध्ये भारतीय नौदलाने ‘आयएनएस राजपूत’वर हे क्षेपणास्त्र तैनात केले होते. भारतातील ब्रह्मपुत्रा नदीतील ‘ब्रह्म’ तसेच रशियातील मोस्क्‍वा नदीतील ‘मोस’ या शब्दांच्या मिश्रणाने ‘ब्राह्मोस’ हा शब्द बनलेला आहे. भारत-रशिया सहकार्याचे प्रतीक म्हणून हे नामकरण करण्यात आले होते. भारतातील ‘डीआरडीओ’ने रशियातील ‘एनपीओ मॅशिनोस्ट्रिया’सह हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. ‘ब्राह्मोस’चे अद्ययावत रूप पाणबुडी, जहाज आणि नौकांना लक्ष्य करण्यासाठी अत्यंत चपखल असे आहे.

 "