Sun, Sep 20, 2020 04:14होमपेज › National › कुठे फेडाल पाप; सेल्फीच्या नादात घेतला हत्तीच्या पिल्लाचा बळी!

कुठे फेडाल पाप; सेल्फीच्या नादात घेतला हत्तीच्या पिल्लाचा बळी!

Published On: Jan 04 2018 8:25PM | Last Updated: Jan 04 2018 8:25PM

बुकमार्क करा
चामराजनगर (कर्नाटक): पुढारी ऑनलाईन 

सेल्फीच्या नादात अनेकांचे मृत्यू झालेल्याचे तुम्ही वाचले असेल. पण सेल्फी घेण्याच्या या हौसेमुळे एका हत्तीच्या पिल्लाला जीव गमवावा लागला आहे.  माणूस म्हणून तुम्हाला देखील लाज वाटेल अशी ही घटना कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात घडली आहे. 

चामराजनगर जिल्ह्यातील कुरूबाराहुंडी हे गाव जंगल परिसरात आहे. सोमवारी या गावात 3 हत्तीनी प्रवेश केला. अन्नाच्या शोधात आलेल्या हत्तींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांनी फटाके फोडले, मोठ्याने आवाज केले. यामुळे बिथरलेले हत्ती पुन्हा जंगलात पळून गेले. पण या गोंधळात हत्तीचे एक पिल्लू आईपासून वेगळे झाले. 

अगदी लहान असलेल्या आणि जखमी झालेल्या या हत्तीच्या पिल्लाला अन्य मोठ्या हत्तींसोबत जंगलात पळून जाता आले नाही. आईपासून दुरावलेले पिल्लू घाबरले आणि रडू लागले. या परिस्थितीत तेथील लोकांनी पिलाला जंगलात परत जाण्यासाठी मदत करण्याऐवजी त्याला घेरले आणि सेल्फी काढू लागले. कॅमेऱ्याचा फ्लॅश, लोकांच्या आवाजामुळे हत्तीचे पिल्लू आणखी घाबरले. या घटनेचे वृत्त कळताच वन आधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी झालेल्या पिल्लाला उपचारासाठी घेऊन गेले. त्यानंतर पिल्लाच्या शोधात आई पुन्हा गावात आली पण तिला पिल्लू दिसले नाही. 

हत्तीच्या पिल्लाची आई त्याला घेण्यास परत येईल असे अधिकाऱ्यांना वाटले. मात्र ग्रामस्थांच्या भीतीने आई पुन्हा आली नाही.  जखमी झालेल्या त्या पिल्लाला  चार बाटल्या ग्लुकोज व इंजेक्शन दिले आणि दुध देखील दिले. मात्र आईपासून दुरावलेल्या आणि लोकांनी सेल्फीच्या हौसेसाठी दिलेल्या त्रासामुळे घाबरलेल्या त्या पिल्लाचा 24 तासातच मृत्यू झाला.