Tue, Jun 15, 2021 12:31
भाजपला झटका; पश्चिम बंगालमध्ये मुकुल रॉय यांनी सोडला पक्ष; तृणमूलमध्ये घरवापसी

Last Updated: Jun 11 2021 4:58PM

कोलकाता : पुढारी ऑनलाईन 

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसला खिंडार पाडण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे मुकुल रॉय यांनी भाजपला रामराम करत पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारी दुपारी ते तृणमूलच्या कार्यालयात आले. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासह अन्य नेत्यांशी चर्चा करून पक्षाची प्राथमिक सदस्यता स्वीकारली. त्यांच्या पक्षप्रवेशाची अधीकृत घोषणा अद्याप झालेली नाही

मुकूल रॉय यांच्या माघारीनंतर भाजपला मोठा झटका बसला आहे. निवडणुकांच्या निकालांनरत सुवेंधु अधिकारी यांना अधिक महत्त्व दिल्याने ते नाराज झाले होते. विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने रॉय काही दिवसांपासून नाराज होते. रॉय यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून समजूतही काढली होती. परंतु ही शिष्टाई फळाला आली नाही. अखेर रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. रॉय हे कृष्णानगर दक्षिणमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 

यूपीए सरकारच्या काळात रेल्वेमंत्री असलेले मुकुल रॉय हे तृणमूलमधील शक्तीशाली नेते मानले जात होते. रॉय हे ममता बॅनर्जी यांच्या जवळचे सहकारी होते. मात्र, २०१७ मध्ये त्यांनी तृणमूलला रामराम करत भाजमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष केले होते. मात्र, बंगालमधील निवडणुकीनंतर रॉय यांच्या नेतेपदाची जागा सुवेंधु अधिकारी यांनी घेतली. त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्याने रॉय नाराज होते.  रॉय यांच्या घरवापसीमुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तृणमूलमध्ये प्रवेश करतील असे सांगितले जात आहे.

रॉय यांना भाजपने गेल्या काही दिवसांपासून लांब ठेवले होते. कृष्णानगर येथील निवडणूक जिंकल्यानंतर रॉय पक्ष सोडतील असे अंदाज वर्तवले जात होते. या अंदाजांना त्यांनी खोडून काढत ट्विट केले होते. ‘बीजेपीचा शिपाई या नात्याने राज्यात लोकशाही स्थापित करण्यासाठी माझी लढाई सुरू राहील. मी सर्वांना आवाहन करतो की, अशा अफवांना पूर्णविराम द्या. मी राजकीय मार्ग मी शोधला आहे.’

पंतप्रधान मोदी यांचा फोन 

रॉय यांच्या पत्नी सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली. त्यानंतर काही वेळातच रॉय यांना पंतप्रधान मोदी यांचा फोन आला. त्यांनी रॉय यांच्या पत्नीची विचारपूस केली. या फोनमुळे पॅचअप झाल्याचे बोलले जात होते मात्र, बॅनर्जी यांनी दोस्तीचा हात पुढे करून रॉय यांची घरवापसी घडवून आणली. 

मुलग्याने मांडली टीएमसीची बाजू 

भाजपकडून तृणमूल काँग्रेसवर हल्ला होत असताना रॉय यांचा मुलगा शुभ्रांशु यांनी एक फेसबुक पोस्ट केली. यात त्यांनी टीका करणाऱ्यांना फटकारले होते. ‘जनतेने निवडून दिलेल्या सराकरवर टीका करणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे.’