Mon, Jan 25, 2021 06:09होमपेज › National › राजस्थान काॅंग्रेसमध्ये फूट; भाजपने पायलट यांना दिली 'ही' ऑफर

राजस्थान काॅंग्रेसमध्ये फूट; भाजपने पायलट यांना दिली 'ही' ऑफर

Last Updated: Jul 14 2020 3:27PM

सचिन पायलटनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेचा लाभ उठविण्यास भाजप उत्सूक दिसत असून मध्य प्रदेशपाठोपाठ या राज्यातही काँग्रेसला उलटे आसमान दाखविण्यासाठी भाजप धुरीणांकडून व्युहरचनेवर विचारविमर्श सुरु झाला असल्याची माहिती मंगळवारी सूत्रांनी दिली. दरम्यान, काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे खुले आहेत, असे भाजपचे वरिष्ठ नेते ओम माथूर यांनी स्पष्ट केले आहे.

वाचा : सचिन पायलट यांच्या पत्नीच्या 'त्या' ट्विटने खळबळ

मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. काँग्रेस विधिमंडळाच्या दुसऱ्या बैठकीला देखील सचिन पायलट गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षात सुरु झाली आहे. गहलोत यांनी बोलावलेल्या पहिल्या बैठकीस १०९ आमदार उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर सरकारकडे बहुमत असल्याचा दावा गहलोत समर्थकांनी केला आहे. दुसरीकडे हे सरकार अल्पमतात आले असून विधानसभेत बहुमत सिद्ध करून दाखवावे, अशी मागणी पायलट समर्थकांनी केली होती. 

ज्योतिरादित्य शिंदे यांना हाताशी धरून काही महिन्यांपूर्वीच भाजपने मध्य प्रदेश काँग्रेसला भगदाड पाडले होते. त्यानंतर येथील कमलनाथ सरकारला गाशा गुंडाळावा लागला होता. मध्य प्रदेशात काँग्रेसकडे काठावरचे बहुमत होते, त्यामुळे या राज्यात भाजपचा डाव सफल होऊ शकला होता. राजस्थानमध्ये मात्र काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ असल्याने अशोक गहलोत निर्धास्त दिसत आहे. मात्र राजकारणात काहीही होण्याची शक्यता गृहीत धरून गहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर कारवाई करण्यासाठीचा पक्ष नेतृत्वावरील दबाव वाढविला आहे. 

इकडे मध्य प्रदेशपाठोपाठ राजस्थानमध्ये काँग्रेसला हादरा देण्यासाठी भाजप आसुसलेली आहे. गहलोत - पायलट वादाकडे आतापर्यंत तटस्थपणे पाहत असलेल्या भाजपने आता थेट पक्ष प्रवेशाची ऑफर पायलट यांना दिली आहे. सचिन पायलट यांनी अलीकडेच आपले जुने सहकारी ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच पायलट भाजपमध्ये जाणार का? या चर्चेने वेग घेतला होता.

सचिन पायलट यांना भाजपकडून मंगळवारी पक्ष प्रवेशाची ऑफर देण्यात आली. भाजपचे वरिष्ठ नेते ओम माथूर यासंदर्भात म्हणाले की, कोणतीही व्यक्ती जर भाजपमध्ये येऊन आमच्या विचारधारेचा स्वीकार करणार असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करतो. सचिन पायलट जर भाजपमध्ये येण्यास उत्सूक असतील तर त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे खुले आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा विषय आहे, भाजपमध्ये हा निर्णय पक्षाचा संसदीय दलाच्या बैठकीत होतो. राजस्थानमधील घडामोडीवर आमचे लक्ष आहे. अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांना चांगली वागणूक दिली नाही, हे सर्वांना माहीत आहे, अशी टिप्पणीही माथूर यांनी केली.

वाचा : सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसकडून मोठी कारवाई, राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरून हटवलं