अडवाणींनी भाजपला आकार, ताकद दिली 

Last Updated: Nov 08 2019 11:13PM
Responsive image


नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपला आकार आणि ताकद दिली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांचा गौरव केला. अडवाणी यांच्या 92 व्या वाढदिनानिमित्त त्यांच्या घरी जाऊन पंतप्रधान मोदींनी त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधानांसमवेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. 

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, विद्वान, राजनीतिज्ञ लालकृष्ण अडवाणी यांनी देशासाठी नेहमीच दिलेले अभूतपूर्व योगदान नेहमी लक्षात राहील. अडवाणी  यांनीच भाजपला आकार दिला, ताकद दिली. यासाठी त्यांनी अनेक दशके प्रयत्न केले. आज भाजप ज्या बळकटीने उभा आहे, त्याचे कारण अडवाणी आणि त्यांनी तयार केलेले कार्यकर्तेच आहेत. त्यांच्याच मेहनतीमुळे हे शक्य झाले. त्यांनी कधीच पक्षाच्या विचारधारेशी तडजोड केली नाही. एक मंत्री, प्रशासक म्हणूनही जगभरात त्यांची स्तुती होते. 

गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले आहे की, अडवाणी यांनी संपूर्ण जीवन राष्ट्रविकास आणि कल्याणासाठी दिले. अद्भूत नेतृत्वातून त्यांनी पक्षाचा भक्‍कम पाया रचला. लाखो कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. त्यांना हार्दिक शुभेच्छा. देशभरातील भाजप नेते, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर पक्षांच्या नेत्यांनीही अडवाणींना शुभेच्छा दिल्या आहेत.