Wed, Jan 20, 2021 21:58
एनसीईआरटीच्या पुस्तकावरून पुन्हा वाद; १२ वी च्या इतिहास पुस्तकात मोघलांनी मंदिर बांधल्याचा उल्लेख  

Last Updated: Jan 14 2021 9:05PM
नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा

एनसीईआरटीच्या 12 वी वर्गासाठीच्या इतिहासाच्या पुस्तकावरून पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकात ‘थीम्स ऑफ इंडियन हिस्ट्री भाग-2’मध्ये मोघलशासकांनी युद्धात मंदिरे पाडून नंतर त्या मंदिरांची दुरुस्ती केल्याचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे, या माहिताचा स्रोतच एनसीईआरटीला माहिती नाही. त्यामुळे या प्रकरणावर वाद निर्माण झाला आहे. 

शिवांक शर्मा यांनी एनसीईआरटीकडे माहिती अधिकारांतर्गत पुस्तकातील मजकुराबाबत काही माहिती मागवली होती. त्याचे उत्तर देण्याऐवजी एनसीईआरटीने याबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे एनसीईआरटीच्या इतिहासाच्या पुस्तकातून तथ्यहिन इतिहास शिकवला जात असल्याचा आरोप होत आहे. याबाबत शिक्षण क्षेत्राशी संबंधित डॉ. इंदू विश्वनाथन यांनी ट्विट केले आहे. 

18 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की, मागितलेली माहिती उपलब्ध नाही. या पत्रावर हेड ऑफ डिपार्टमेंट अँड  पब्लिक इन्फर्मेशन ऑफिसर प्रा. गौरी श्रीवास्तव यांची सही आहे. 

काय आहे पुस्तकातील उतार्‍यात?

गतवर्षी एनसीईआरटीच्या 12 वीच्या इतिहासाच्या पुस्तकात ‘थीम्स ऑफ इंडियन हिस्ट्री भाग-2’ च्या पान क्रमांक 234 वर दुसर्‍या परिच्छेदामध्ये असलेल्या माहितीचा स्रोत माहिती अधिकारातून विचारण्यात आला होता. या परिच्छेदामध्ये म्हटले आहे, की जेव्हा युद्धात मंदिरे पाडली गेली त्यानंतर शाहजहान आणि औरंगजेब यांनी या मंदिरांच्या दुरुस्तीसाठी निधी दिला होता. 

किती मंदिरे बांधली, याचीही माहिती नाही 

माहिती अधिकारांतर्गत दुसर्‍या प्रश्नामध्ये औरंगजेब आणि शाहजहान यांनी किती मंदिरांची दुरुस्ती केली, असे विचारले होते. या प्रश्नाच्याही उत्तराबाबत माहिती उपबल्ध नसल्याचे उत्तर एनसीईआरटीने दिले आहे.