Fri, Sep 18, 2020 19:41होमपेज › National › 'त्या' कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टराच्या संपर्कात आले ८०० जण! 

'त्या' कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टराच्या संपर्कात आले ८०० जण! 

Last Updated: Mar 26 2020 7:05PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

दिल्लीतील मौजपूरमधील एका कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टराच्या संपर्कात ८०० जण आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टर मोहल्ला क्लिनिकमधील असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना १४ दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये पाठविण्यात आले आहे. याबाबतची माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी गुरुवारी दिली.

जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहल्ला क्लिनिकमधील एक डॉक्टर आणि अन्य चारजणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. ते सौदी अरेबिया येथून आलेल्या महिलेच्या संपर्कात आले होते. डॉक्टरांची मुलगी, पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, सर्व प्रकारची खबरदारी घेऊन मोहल्ला क्लिनिक्स सुरुच राहतील. तसेच फूड होम डिलिव्हरी सेवेला परवानगी आहे. मात्र, घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीने ओळखपत्र दाखवायला हवे.

जे लोक कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टराच्या संपर्कात आले होते त्यांना काही लक्षणे दिसून आल्यास त्यांनी कंट्रोल रूमशी संपर्क साधावा, असे आवाहन याआधी शाहदाराचे उप विभागीय दंडाधिकाऱ्यांनी केले होते.

दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवीन ६ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे दिल्लीतील एकूण रुग्णांचा आकडा ३६ वर पोहोचला आहे.    

 "