Sat, Sep 19, 2020 07:49होमपेज › National › आंध्रप्रदेश: कोविड सेंटरमध्ये अग्नितांडव, ९ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्रप्रदेश: कोविड सेंटरमध्ये अग्नितांडव, ९ जणांचा होरपळून मृत्यू

Last Updated: Aug 09 2020 11:04AM
विजयवाडा (आंध्र प्रदेश) : पुढारी ऑनलाईन 

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील हॉटेलमध्ये भीषण आग लागून यात ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले व त्यांनी आग आटोक्यात आणली. हे हॉटेल कोविड सेंटर म्हणून वापरले जात होते. हॉटेलमध्ये अडकलेल्या इतर लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजयवाडा येथील हॉटेल गोल्डन पॅलेसमध्ये रविवारी पहाटे आग लागली. ही दुर्घटना घडली तेव्हा हॉटेलमध्ये ३० क्वारंटाईन झालेले व १० आरोग्य कर्मचारी असे एकूण ४० जण होते. आगीत होरपळून ९ जणांना प्राण गमवावा लागला आहे. तर इतरांना वाचवण्यात यश आले आहे. 

 

या दुर्घटनेबाबत बोलताना कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद इम्तियाज म्हणाले की, विजयवाडा येथील हे दुर्घटनाग्रस्त हॉटेल कोविड सेंटर होते. या ठिकाणी कोरोना रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आले होते. पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुमारे २२ रूग्णांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आत्ता आम्ही संपूर्ण इमारत रिकामी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आग विझवण्यात आली आहे. प्राथमिक अहवालानुसार आगीचे कारण शॉट सर्किट आहे. परंतु आता त्याचे कारण शोधणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे पावले उचलली जात आहेत. 

दरम्यान, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी कोविड सेंटर असलेल्या हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. 
 

 "