Fri, Jul 03, 2020 01:41होमपेज › National › दिल्‍ली पुन्हा भूकंपाने हादरली; लॉकडाऊनमध्ये लोक आले रस्त्यावर 

दिल्‍ली पुन्हा भूकंपाने हादरली; लॉकडाऊनमध्ये लोक आले रस्त्यावर 

Last Updated: May 29 2020 10:58PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात शुक्रवारी रात्री ९ वाजून ०८ मिनिटांनी भुकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनूसार भूंकपाचे केंद्र दिल्लीपासून ७० किलोमीटर दूर हरियाणातील रोहतक जिल्ह्यात होते. भूंकपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. ३.३ किलोमीटर खोलीवर भूकंपाचे केंद्रबिंदू होते. दिल्लीकरांना जवळपास तीन सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरिदाबादसह पंजाबमध्येही भूंकप जाणवला. सुदैवाने कुठल्याही प्रकारचा जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

भूकंपाचे धक्के जाणवल्याने दिल्लीकरांनी घर तसेच कार्यालयाबाहेर धाव घेतली. गुरुवारी हरियाणातील फरिदाबादमध्ये भूकंपाचे सौम्य धक्का जाणवले होते. 

यापूर्वी १२, १३ एप्रिल तसेच १० मे ला राजधानीत भूकंपाचे धक्के जावणले होते. भूकंपाच्या अनुषंगाने दिल्ली तसेच एनसीआर क्षेत्र संवेदनशील आहे. १० मे ला ३.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचे हादरे राजधानी दिल्लीला बसले होते. गुरुवारी रात्रीपासूनच दिल्लीतील काही भागात तसेच भुकंपाचे केंद्र असलेल्या रोहतकमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशात पावसासोबतच भुकंपाच्या धक्क्याचा सामना नागरिकांना करावा लागला. 

राजधानी दिल्ली हिमालय पर्वरांगापासून बरेच जवळ आहे. राज्याला त्यामुळे अनेकदा भुकंपाचे धक्के बसतात. संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने रस्त्यांवर फारशी वर्दळ नाही. शहरातील वाहनांचा गोंगाटही कमी झाला आहे. अशात घरात असलेल्यांना भूंकपाचे धक्के स्पष्टपणे जाणवले.  कमी तीव्रतेचे भुकंपाचे धक्के देखील त्यामुळे जाणवत आहेत.