होमपेज › National › ‘१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत लक्षात ठेवा’

‘१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत लक्षात ठेवा’

Last Updated: Feb 20 2020 8:05PM
बंगळूर : वृत्तसंस्था

हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या ‘एआयएमआयएम’चे राष्ट्रीय प्रवक्‍ते वारिस पठाण यांनी याच पक्षाचे खासदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या वक्‍तव्याची आठवण जागविणारे एक वादग्रस्त वक्‍तव्य केले आहे. 

कर्नाटकच्या गुलबर्गा येथे झालेल्या एका सभेत बोलताना वारिस यांनी, ‘100 कोटींना (हिंदू) 15 कोटी (मुस्लिम) केव्हाही भारी पडतील’, असे धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्‍तव्य केले. स्वातंत्र्य दिले जात नसेल तर ते आम्हाला मिळवावे लागेल, असे निरर्थक व भडकावू विधानही त्यांनी केले.

वारिस पठाण यांच्या या वक्‍तव्यानंतर राजकीय घमासान सुरू झाले आहे. वारिस पठाण हे मुंबईच्या भायखळा मतदारसंघाचे आमदार आहेत. ‘ईंट का जवाब पत्थर’ हेच इथून पुढे आमचे धोरण असेल, असे ते म्हणाले. मुकाबला करायचा तर मुस्लिमांना यासाठी एकत्र वाटचाल करावी लागेल. शाहीनबाग आंदोलनाचा संदर्भ देऊन पठाण म्हणाले, “आमचे विरोधक म्हणतात की, आम्ही स्त्रियांना पुढे करतो... पण लक्षात घ्या, सध्या तर फक्‍त वाघिणी बाहेर पडल्या आहेत; तर तुम्हाला घाम फुटला. मग, आम्ही सगळे वाघ (मुस्लिम पुरुष) एकत्र आलो तर तुमचे काय हाल होतील, हे समजून जा. आम्ही 15 कोटी आहोत, पण तुम्हा 100 कोटींना वरचढ आहोत, हे ध्यानात ठेवा.” वारिस पठाण यांच्या या व्हिडीओवर समाजमाध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वारिस पठाण यांच्या या वक्‍तव्यावर विश्‍व हिंदू परिषदेनेही तीव्र टीका केली आहे.

मौलवींकडूनही पठाणांवर टीका

मुस्लिम मौलवींनीही वारिस पठाण यांच्या या वक्‍तव्यावर टीका केली आहे. पठाण यांनी घृणा निर्माण करणारे वक्‍तव्य केले असल्याचे अनेक मुस्लिम मौलवींनी  म्हटले आहे. ‘या देशातील हिंदू हे मुस्लिमांसोबत उभे आहेत आणि मुस्लिम हे हिंदूंसोबत... त्यांना परस्परांविरोधात उभे करणारे कुणीही असो, त्यांच्यासाठी इथे जमीन शिल्लक उरणार नाही, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया मौलवींतून उमटली आहे. अशा विचारधारेने देशाला नुकसान सोसावे लागेल, असेही मौलवींनी म्हटले आहे.