Fri, Jun 05, 2020 15:51
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › पंचवटीत विवाहितेचे रिक्षातून अपहरण; दोघांकडून बलात्कार

पंचवटीत विवाहितेचे रिक्षातून अपहरण; दोघांकडून बलात्कार

Published On: Apr 02 2019 2:00AM | Last Updated: Apr 02 2019 12:36AM
पंचवटी : वार्ताहर 

पंचवटीतील 22 वर्षीय विवाहित महिलेचे रिक्षातून अपहरण करून रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने रात्रभर तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या बीट मार्शलनी या संशयितांना महिलेसह बघूनदेखील चिरीमिरी घेऊन दुर्लक्ष केल्याने बलात्काराची घटना घडल्याचा आणि त्यानंतर त्यांचेच साथीदार असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यातील अधिकार्‍याने गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप संबंधित महिला व तिच्या नातेवाइकांनी केला आहे. अखेर, नातेवाइकांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सुनावल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. रात्रीची घटना असताना गुन्हा दाखल करण्यास दुपारचे अडीच वाजले. रात्रभर नराधमांकडून अत्याचार सहन करणार्‍या पीडितेला दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत पोलिसांच्या जाचाला सामोरे जावे लागल्याने पोलीस प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

पंचवटीतील कर्णनगर येथील ही महिला रात्री 10 वाजता किराणा दुकानातून तांदूळ घेऊन घरी जात असताना बाळा (रा. बळीमंदिर) नावाच्या रिक्षाचालकाने आणि त्याच्या काळ्या नावाच्या एका मित्राने (पूर्ण नाव माहित नाही) पतीला मारण्याची धमकी देऊन तिला बळजबरीने रिक्षात बसवले व आधी पेठरोडला मार्केट यार्डात व त्यानंतर मखमलाबाद येथील एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नेऊन पुन्हा बलात्कार केला.

दरम्यान महिलेच्या नातलगांनी ती हरविल्याची तक्रार रात्री एकच्या सुमारास पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती. इकडे संशयितांनी रात्रीपासून पहाटेपर्यंत सामूहिक बलात्कार करून महिलेला पहाटे 4 वाजता कर्णनगर येथे आणून सोडून दिले. यावेळी तिची अवस्था फारच बिकट झालेली होती. तिला चालणेदेखील मुश्किल झाले होते. तिच्याकडून घरच्यांनी घडलेला सर्व प्रकार ऐकून घेत सकाळी पंचवटी पोलीस ठाणे गाठले. मात्र, सहायक पोलीस निरीक्षकांनी महिला सापडल्याने हरविल्याची तक्रार निकाली काढत घरी जाण्यास सांगितले. यावर महिलेच्या नातेवाइकांनी रात्रभर तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगताच ‘हा तुमचा कौटुंबिक वाद असून घरी जाऊन मिटवा’, असे सांगितल्याने नातेवाइकांनी रोष व्यक्त केला. याबाबत पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितल्यावर आणि एका अधिकार्‍याने पुढाकार घेतल्याने गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली.  
बीट मार्शलवर होणार कारवाई : बीट मार्शल यांनी पीडितेला संशयितांच्या तावडीतून सोडवून नातेवाइकांच्या हवाली करण्याऐवजी चिरीमिरी घेऊन या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्यावर देखील कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. 

पोलिसांचा बेजबाबदारपणा

बलात्कारासारखा गंभीर गुन्हा घडलेला असतानाही पीडितेला दुपारपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. या दरम्यान तिला अनेकदा उलट्या झाल्या तरीही पोलीस प्रशासन ढिम्म होते. खाकी वर्दीतल्या एकाच्याही हृदयाला पाझर फुटला नाही. अखेरीस दुपारी अडीच वाजता गुन्हा दाखल करून तीन वाजता पीडितेची तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या सर्व प्रकारामुळे पीडितेच्या नातेवाइकांनी पोलिसांच्या या बेजबाबदार कामकाजावर प्रचंड नाराजी व्यक्त केली. 

कारवाईसाठी नातेवाइकांचे आर्जव

पीडिता तक्रार देण्यासाठी आल्यानंतरदेखील संशयितांचे मोबाइल सुरू होते. त्यांना पकडण्यासाठी नातेवाइकांनी पोलिसांना अनेकदा विनवण्या केल्या, मात्र त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. याबाबत सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर यांना माहिती मिळताच त्यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार ऐकून घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 

पोलीस आयुक्तांच्या वक्तव्याला छेद

पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पदभार स्वीकारतेवेळी शहरातील महिलांच्या सुरक्षिततेला सर्वप्रथम प्राधान्य देणार असल्याचे सांगत गुन्हेगार आपला वैयक्तिक दुश्मन असेल, असे सांगितले होते. मात्र, त्यांच्या वक्तव्याला छेद देण्याचे काम त्यांचेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी करीत असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.