Thu, Jul 02, 2020 18:56होमपेज › Nashik › पोलीस ठाण्यासमोरच महिलेने पेटवून घेतले

पोलीस ठाण्यासमोरच महिलेने पेटवून घेतले

Last Updated: Feb 10 2020 7:36PM
पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

कौटुंबिक वादातून महिलेने येथील पंचवटी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरजिंदर संधू असे या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी परिसरातील टकलेनगर येथील रहिवासी अमनप्रीत सिंग संधू (27) हिचे 18 जानेवारी रोजी आई-वडिलांनी छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील युवकासोबत लग्न लावून दिले होते. लग्नानंतर काहीच दिवसांत नवर्‍याकडून मारहाण होत असल्याचा आरोप करत अमनप्रीत शनिवारी (दि.8) रायपूर येथून नाशिकमधील गंजमाळ येथे राहणार्‍या मैत्रिणीकडे आली होती. याची माहिती तिच्या वडिलांना कळताच त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात येऊन आपले म्हणणे सांगितले. दरम्यान, सोमवारी पोलीस अधिकार्‍यांनी या मुलीला आणि नातेवाइकांना ठाण्यात बोलावून घेत एकमेकांकडून कोणालाही त्रास होणार नसल्याचे जाबजवाब घेत प्रकरण मिटविले. 

जाबजबाबानंतर पंचवटी ठाण्यात आलेले नातेवाईक घरी जाण्यासाठी निघाले असता या मुलीची आई हरजिंदर संधू ही पंचवटी पोलीस ठाण्याच्या बाहेर आली. ज्वलनशील पदार्थ तिने अंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले. ही घटना लक्षात येताच ठाणे आवारात असलेले पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक, शिवराम खांडवी यांच्यासह महिलेच्या नातेवाइकांनी आग विझविली. त्यानंतर तिला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ती सुमारे 55 टक्के भाजली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अचानक पोलीस ठाण्यासमोर घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. 

स्वतंत्र राहण्याची महिलेची इच्छा
अमनप्रीत सिंग संधू हिने वडिलांनी आपल्या मनाच्या विरुद्ध लग्न करून दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आपल्या अडचणीच्या वेळेत कोणीही मदत केली नसल्याने आपल्याला आई-वडिलांकडे जायचे नसून कुठेतरी काम करून उदरनिर्वाह करणार असल्याचे जबाब दिल्याचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले आहे.