Tue, May 26, 2020 11:00होमपेज › Nashik › चारही ‘ज्ञानपीठ’ विजेत्यांचे जीवनपट साकारणार

चारही ‘ज्ञानपीठ’ विजेत्यांचे जीवनपट साकारणार

Published On: Jul 25 2019 1:50AM | Last Updated: Jul 25 2019 1:50AM
नाशिक : प्रतिनिधी

‘ज्ञानपीठ’ हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान प्राप्त करणार्‍या राज्यातील चारही मराठी साहित्यिकांचे जीवनपट येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे साकारले जाणार आहेत. यांपैकी कुसुमाग्रजांवरील लघुपटाचे चित्रीकरणही सुरू झाले आहे. 

ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज, विंदा करंदीकर व भालचंद्र नेमाडे या चार मराठी साहित्यिकांना ‘ज्ञानपीठ’ या देशातील सर्वोच्च साहित्य पुरस्काराने आजवर सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे जीवन व साहित्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे जीवनपट बनविण्याचा प्रस्ताव कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे शासनाकडे मांडण्यात आला आहे.  मात्र, त्याला मंजुरी मिळण्यापूर्वीच या योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. कुसुमाग्रजांच्या लघुपटापासून त्याची सुरुवात केली जात आहे. त्याचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक, अभिनेते चंद्रकांत कुलकर्णी करणार असून, संहिता प्रशांत दळवी यांनी लिहिली आहे. सुमारे 30 ते 35 मिनिटांच्या या लघुपटात कुसुमाग्रजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग, त्यांच्या नाटकांतील स्वगते, कविता, त्यांच्या स्नेह्यांच्या मुलाखतींचे अंश आदी बाबींचा समावेश राहणार आहे. या लघुपटाचे नाव अद्याप निश्चित व्हावयाचे आहे. लघुपटासाठी तात्यासाहेबांच्या नाटकांतील काही प्रवेशांचे चित्रीकरण नुकतेच मुंबईच्या यशवंत नाट्यगृहात पार पडले. या चित्रीकरणात गिरिजा ओक, मृण्मयी देशपांडे, सुनील बर्वे, समीधा गुरू, प्रसाद ओक, प्रतीक्षा लोणकर, राजश्री ठाकूर व सुबोध भावे या कलावंतांचा सहभाग होता. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, आमदार हेमंत टकले, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अरविंद ओढेकर, विलास लोणारी, विनायक रानडे, लोकेश शेवडे आदी उपस्थित होते.