Tue, Nov 19, 2019 02:29होमपेज › Nashik › पत्नीच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

पत्नीच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

Last Updated: Oct 10 2019 11:21PM
नाशिक : प्रतिनिधी

पिकअप घेण्यासाठी माहेरून 50 हजार रुपये आणण्यासाठी पत्नीचा छळ करून तिचा खून करणार्‍या पतीस जिल्हा न्यायाधीश सुनीता नायर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कैलास गोपाळ चव्हाण (32,रा.फुले मार्केट, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. कैलासने 12 मे 2012 रोजी रात्री त्याची पत्नी सुनीताचा खून केला होता. 

पिकअप वाहन घेण्यासाठी माहेरून 50 हजार रुपये आण, अशी मागणी कैलास चव्हाण याने पत्नीकडे केली होती. 12 मे रोजी देखील याच कारणावरून कुरापत काढून सुनीताचा छळ करून तिला गळफास देत खून केला. 

या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात कैलास विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. न्यायालयात साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे कैलासने खून केल्याचा आरोप शाबित झाल्याने न्यायालयाने त्यास पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच, 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद आढाव, कैलास पाटील यांनी कामकाज पाहिले.