Sun, Sep 27, 2020 03:43होमपेज › Nashik › जोर-बैठका, उठाबशा अन् दंडुके

जोर-बैठका, उठाबशा अन् दंडुके

Last Updated: Mar 25 2020 11:36PM
नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

संचारबंदीतही विनाकारण शहरात फिरणार्‍या हुल्‍लडबाजांना पोलिसांकडून धडा शिकवला जात आहे. उठाबशा, जोर-बैठका काढण्यासोबतच पळणार्‍यांना दंडुक्याचा प्रसाद देत त्यांना पिटाळून लावत संचारबंदीची आठवण दिली. यावेळी बाहेर फिरणार्‍या अनेकांनी वेगवेगळी कारणे पोलिसांना सांगितली. मात्र, पोलिसही  हुशारी दाखवून टवाळखोरांचे पितळ उघडे पाडत त्यांना अद्दल घडवत आहेत.

देशासह राज्यात संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. अत्यावश्यक असल्यास व जीवनावश्यक बाबींच्या खरेदीसाठी त्यांना घराबाहेर पडता येणार आहे. मात्र, कोणत्याही प्रकारचे वाहन वापरता येणार नाही. त्यानुसार नागरिक घराबाहेर पडू शकतात. मात्र या आदेशाला अनेक नागरिक हरताळ फासत आहेत. हु्ल्‍लडबाजी करण्यासाठी तसेच विनाकारण फिरण्यासाठी अनेकजण वाहने घेऊन जात आहेत. घराजवळील दुकाने, मेडिकल सोडून लांबच्या दुकानांमध्ये जाण्याचा प्रयत्न नागरिक करीत आहेत. त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढत आहेत. पोलिसांनीही ठिकठिकाणी नाकाबंदी करुन नागरिकांची चौकशी केली. यावेळी विनाकारण फिरणार्‍या नागरिकांना चांगलाच धडा शिकवला. हुल्‍लडबाजी करणार्‍यांना  उठाबशा, जोर बैठका मारण्यास सांगितले. तर अनेकांना दंडुक्यांचा प्रसाद देत पिटाळून लावले. 

..अन् बनवाबनवी उघड

पोलिसांनी पकडल्यानंतर एकाने खिशातून चिठ्ठी काढून देत मेडिकलमध्ये जात असल्याचे सांगितले. काठी खाली ठेवून पोलिसांनी चिठ्ठी तपासली असता ती कोरी निघाली. त्यामुळे पापणी लवते न लवते तोच काठीचा प्रसाद चिठ्ठी देणार्‍यास मिळाला. काहीही न बोलता महाशय तेथून चालते झाले. एका कारमध्ये पाठीमागील सीटवर युवक झोपलेला होता, तर दोघे पुढे बसून जात होते. पोलिसांनी अडवल्यानंतर पाठीमागील युवकास त्रास होत असून त्यास रुग्णालयात नेत असल्याचे सांगितले. मात्र, तिघांचेही कपडे पाहून पोलिसांनी पाठीमागे झोपेचे सोंग घेणार्‍याच्या पायावर काठी ठेवून बाहेर येण्यास सांगितले. तिघांचा बनाव असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांना उठाबशा काढण्यास सांगितले. तर अनेकांनी किराणा घेण्यास चाललो, घरातील सदस्य आजारी आहे त्यांना घेण्यासाठी चाललो, मेडिकलमध्ये जात आहे अशी कारणे दिली. मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून आणि अनुभवातून हे खोटे लगेच उघडे पडत असल्याने या सर्वांना काही ना काही प्रसाद मिळतच असल्याचे दिवसभर चित्र होते.

 "