Tue, Jul 07, 2020 06:09होमपेज › Nashik › 'कोरोना रुग्ण आढळल्यास खासगी रुग्णालय सील करू नये'

'कोरोना रुग्ण आढळल्यास खासगी रुग्णालय सील करू नये'

Last Updated: May 26 2020 3:22PM
नंदुरबार भाजपा जिल्हाध्यक्षांची मागणी 

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात एखादा रुग्ण उपचार घेत असताना तो कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास ते रुग्णालय १४ दिवस सील करू नये, अशी महत्वपूर्ण मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी केली आहे. निवासी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे निवेदन देऊन ही मागणी केली आहे. कोरोना महामारीच्या अनुषंगाने प्रचंड भीतीचे वातावरण असतानादेखील नंदुरबार जिल्ह्यातील खासगी डॉक्‍टर त्यांच्या रुग्णालयांमध्ये आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करीत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या ताणदेखील कमी झाला आहे. 

ज्या पद्धतीने शासकीय रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका सफाई कामगार व पोलिस प्रशासन कोरोना महामारीच्या युद्धात सहभागी झाले. तसेच खासगी डॉक्टरदेखील या लढ्यात ठामपणे उभे असताना दुर्दैवाने एखाद्या रुग्णालयामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास ते रुग्णालय १४ दिवस सील करण्यात येते. तसे न करता केवळ ४८ तास पूर्ण हॉस्पिटल निर्जंतूक करून पूर्ववत सुरू करण्याच्या संदर्भात कार्यवाही करावी. नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एखादी खासगी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास संपूर्ण रुग्णालय सील करण्याची आवश्यकता अथवा त्या परिसरातील कार्यालय दुकाने बंद करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. शिष्टाचार याप्रमाणे निर्जंतुकीकरण केल्यानंतर रुग्णालय ४८ तासात सुरू करावे, असेदेखील भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

खासगी रुग्णालय १४ दिवस सील केल्यामुळे त्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. शिवाय, डॉक्टरांचे मनोधैर्यदेखील खचते, असे भाजप जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी देव मोगरा एज्युकेशन संस्थेचे चेअरमन राजेंद्र गावित, जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मनोज तांबोळी उपस्थित होते.