Tue, Aug 11, 2020 21:49होमपेज › Nashik › बालभारती कर्मचार्‍यांना एक महिन्याचा अतिरिक्‍त पगार

बारावीसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्‍तीची : शिक्षणमंत्री तावडे  

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : विशेष प्रतिनिधी

वर्गातील शिक्षणामुळे विषय अधिक समजतो. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाच्या तासाला बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य केली जाणार आहे. उपस्थिती कमी असणार्‍यांना परीक्षेस बसता येणार नाही. त्यामुळे इन्टिग्रेटेड क्लासेसमुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टळणार आहे, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. 

गुरू गोविंद सिंग महाविद्यालयात आयोजित महाराष्ट्र राज्य पुस्तक निर्मिती महामंडळाचा (बालभारती) सुवर्णमहोत्सव सांगता समारंभ आणि अंबड येथील बालभारती इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गायक स्वप्निल बांदोडकर, बालभारतीचे संचालक सुनील मगर, गुरू गोविंद सिंग संस्थेचे संचालक गुरुदेवसिंग बिरदी, आमदार सीमा हिरे, आमदार जयंत जाधव, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी तावडे म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी बालभारती संस्था पाहिली पाहिजे. कारण गव्हापासून तयार होणारी आपल्या आईच्या हातची पोळी कोणकोणत्या प्रक्रियेतून जाते, हे विद्यार्थ्यांना कळत नाही. त्याप्रमाणे बालभारतीची  पुस्तक निर्मिती कशी होते, हे सर्वांसमोर आले पाहिजे. बालभारतीची वैभवशाली परंपरा  पुढे नेत असल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या सर्व कर्मचार्‍यांना एक महिन्याचे वेतन, तर पेन्शनधारक निवृत्त कर्मचार्‍यांना एक महिन्याचे पेन्शन आणि एक हजार रुपये वाढ भेट म्हणून घोषित केली. ही भेट म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रेमाने व्यक्‍त केलेल्या भावना आहेत. पाश्‍चिमात्य देशात 1980 मध्ये ज्ञानरचनावाद स्वीकारला गेला. मात्र, भारतात त्याचा स्वीकार सन 2006 मध्ये झाला. राज्य शासनाने त्यानुसार अभ्यासक्रमांची रचना करणे सुरू केले असून, कौशल्याधारित शिक्षणाला महत्त्व दिले जात असल्याचे तावडे म्हणाले. 

 यावेळी ऑनलाइन यंत्रणेद्वारे नाशिक भांडार इमारतीचे उदघाटन आणि किशोर मासिकाच्या डिजिटायझेशन उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. गायक स्वप्निल बांदोडकर यांनी ‘श्रावणमासी हर्षमानसी...’ ही कविता आणि गणिताच्या सूत्रावर आधारित ‘सूत्राचा हा खेळ मांडियेला’ हे गीत सादर केले. गणितातील सूत्रे आणि मराठीतील कवितांना नवा संगीतसाज देऊन नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पाठ्यपुस्तक मंडळाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याचे बांदोडकर यांनी सांगितले. प्रास्तविकपर भाषणात सुनील मगर यांनी, गेल्या वर्षापासून बालभारतीने आठवी ते दहावीची पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले. बालभारतीचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी डिजिटायझेशन केले जात असल्याचे मगर यांनी सांगितले.