Wed, Jun 03, 2020 22:25होमपेज › Nashik › कोणाचं घडलंय... कोणाचं बिघडलंय...

कोणाचं घडलंय... कोणाचं बिघडलंय...

Published On: Sep 22 2019 1:33AM | Last Updated: Sep 21 2019 10:52PM
पेच-प्रसंग : सुधीर कावळे
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप, त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींची झालेली जाहीर सभा आणि त्या पाठोपाठ जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुका यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. वरकरणी या तीन वेगवेगळ्या घटना असल्या तरी तिन्ही घटना एकमेकींशी पूर्णत: निगडित आहेत. कारण विधानसभा निवडणुका येणार म्हणूनच फडणवीस यांनी ‘महाजनादेश’ मागण्यासाठी यात्रा काढली आणि मोदी यांच्या सभेतून जणू या निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फुटला. कारण त्या सभेनंतर 48 तासांच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. वेळ वाया घालवायचाच नाही असे जणू मोदी-फडणवीस यांच्या सरकारांनी ठरविलेले आहे. कारण मोदींची सभा आणि निवडणुकीची घोषणा याच्यामध्ये उरलेल्या दिवशी केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देणार्‍या मोठ्या कॉर्पोरेट सवलतींचा असा काही पाऊस पाडला की त्यात शेअर बाजारातील मरगळ पुरती वाहून गेली. आताही निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे तो भाजपाच्या सोयीचा आहे, अशी टीका होण्यास सुरुवात झाली आहे.

मात्र हे वेळापत्रक संभाव्य बंडखोरी अगदी कमीत कमी व्हावी यासाठी केवळ भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे असे नाही, तर इतर पक्षांनीही भाजपाच्याच पद्धतीने काम केले तर त्यांचीही बंडखोरी कमी होऊ शकेल. येत्या शुक्रवारी निवडणुकीची अधिसूचना जारी होईल. त्याच दिवशीपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असले तरी दुसर्‍या दिवशी सर्वपित्री अमावास्येपर्यंत कोणी अर्ज भरण्याची शक्यता कमीच दिसते. तिसर्‍या दिवशी रविवार आणि बुधवारी गांधी जयंतीची राष्ट्रीय सुट्टी. म्हणजे 30 सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या 1,3,4 तारखा असे चारच दिवस अर्ज भरले जातील. शेवटच्या दिवशी एबी फॉर्म येतील अशी बहुधा रचना केली जाईल. हे सगळ्याच पक्षांचे होऊ शकते. त्यामुळे राहता राहिला एकच महत्त्वाचा प्रश्‍न तो म्हणजे शिवसेना-भाजपा युती होणार की नाही? कारण बंडखोरीचा धोका सगळ्याच राजकीय पक्षांना आहे. त्यात युती झाली नाही आणि दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले तर त्यांना गेल्या 2014 च्या निवडणुकीप्रमाणे जास्त जागा लढायला मिळतील आणि मग बंडखोरीचा धोका निम्म्याने कमी होईल. 

नाशिक जिल्ह्यापुरता विचार करायचा तर गेल्या वेळी नाशिक पूर्व, पश्‍चिम, मध्य आणि चांदवड या चार जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. देवळाली, सिन्नर, निफाड आणि मालेगाव बाह्य या चार मतदारसंघांमध्ये शिवसेना जिंकली होती. दिंडोरी, येवला, नांदगाव आणि बागलाण या चार ठिकाणी राष्ट्रवादी, तर इगतपुरी आणि मालेगावमध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता. कळवण-सुरगाणा मतदारसंघात माकपचे जिवा पांडू गावित आपला गड राखून होते. यापैकी इगतपुरीच्या निर्मला गावित यांनी वार्‍याची दिशा ओळखून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दिंडोरीतील रामदास चारोस्कर व लोकसभेला सेना सोडून गेलेले धनराज महालेही पुन्हा सेनावासी झाले आहेत. ‘भाजपाकडे सगळे घोटाळेबहाद्दर येत आहेत. या गुन्हेगारांना पावन करून घेण्यासाठी भाजपाकडे निरमा साबण आणि गंगाजल आहे का’ असा खोचक सवाल शिवसेनेच्या काही नेत्यांनी मध्यंतरी केला होता. मात्र नाशिकमधील राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते छबू नागरे यांना सेनेत दाखल करून घेताना त्यांच्या बनावट नोटा अचानक चलनी झाल्या की काय? मालेगावचे राष्ट्रवादीचे माजी आमदार मौलाना मुफ्ती एमआयएममध्ये दाखल झाले आहेत. त्यांची तेथील उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे.

याखेरीज काही संभाव्य पक्षांतरांची चर्चा होत राहिली. त्यापैकी राष्ट्रवादीच्या बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाची कहाणी सध्या तरी अधुरी राहिली आहे; मात्र माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असे अनेकदा स्पष्ट करूनही त्यांच्या सेनाप्रवेशाची चर्चा थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यांनी येवल्यातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरल्यावरच ती कदाचित थांबेल! मात्र भुजबळ खरेच सेनेत गेले किंवा गेले असते तर साहजिकच पंकज भुजबळही त्यांच्यासमवेत गेले असते आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळही सेनावासी होण्याची शक्यता होती. तसे झाले असते तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस जिल्ह्यात औषधालाही उरली नसती. नाही म्हणायला मालेगावमध्ये आज आसिफ शेख काँग्रेसचे आमदार आहेत. पण आजची काँग्रेसची गलितगात्र अवस्था आणि एमआयएमचा मालेगावातील वाढता प्रभाव पाहून निवडणुकीनंतरचे चित्र कसे असेल, याचा अंदाज येऊ शकतो. अर्थात या सगळ्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांचा करिश्मा बरेच काम करतो यात शंका नाही.

महाजन यांनी मोदींच्या सभेत उत्तर महाराष्ट्रातील 47 पैकी 44 ते 45 जागा जिंकण्याचा विश्‍वास व्यक्‍त केला आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणूक असो की धुळे आणि नगरची महापालिका निवडणूक, महाजन यांचे आकडे कधी चुकले नाहीत. उलट ते एवढे अचूक ठरले आहेत की, भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने ईव्हीएमविषयी घेतलेली शंका खरी आहे की काय, असे कोणालाही क्षणभर वाटून जावे. मात्र यावेळी महाजन यांनी व्यक्‍त केलेला अंदाज खरा ठरायचा असेल तर भाजपाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जी गळती लागली आहे, ती पाहून भाजपा-सेनेला आज आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. मात्र जसा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस जवळ येत राहील, तसतसे भाजपा आणि शिवसेनेतीलही इच्छुक इतर पक्षांकडे तिकिटासाठी पळू लागले तर आश्‍चर्य वाटू नये. कालच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ‘राजगड’ या ठक्कर बाजार स्थानकाशेजारील मुख्यालयात जी बैठक झाली, त्यात मनसेने जिल्ह्यातील सर्व 15 जागा लढविण्याची घोषणा केली. मात्र त्या लढविण्यासाठी मनसेकडे नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले आणि पश्‍चिम किंवा मध्यमधून नितीन भोसले वगळता स्वत:चे उमेदवार कोठे आहेत? मग मनसे ज्या उर्वरित जागा लढविणार आहे त्या कोणाच्या भरवशावर? एवढेच नव्हे तर प्रसंगी वंचित आघाडी किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीसुद्धा भाजपा आणि शिवसेनेतून तिकीट न मिळाल्याने बाहेर पडू इच्छिणार्‍यांसाठी लाल गालिचा अंथरतील यात शंका नाही. त्यामुळे असे होण्याची शक्यता आहे की, जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांत उमेदवारांचे काँग्रेस गवतच उगवेल.

युती झाल्यास भाजपा-सेनेचा एक, न झाल्यास दोन उमेदवार (पश्‍चिमसारख्या मतदारसंघात युती होवो किंवा न होवो चार उमेदवारांची शक्यता), काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा एक (प्रसंगी चांदवड, येवला अशा ठिकाणी त्यातही बंडखोरीची शक्यता), किंवा आयात उमेदवार दिला म्हणून बंडखोरी, मनसेचा एक, वंचित आघाडीचा एक असे प्रमुख पाच-सहा उमेदवार याखेरीज हौशे-नवसे-गवसे अशी यादी वाढत जाणार आहे. त्यामुळे भाजपाला आणि शिवसेनेला तर उमेदवारांची नावे जाहीर करताना खूप खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्याचे एक ताजे उदाहरण म्हणजे काल जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर आणि त्यांचे श्‍वशूर हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि या पक्षांतराने, सेनेत गेलेल्या निर्मला गावित यांना आव्हान निर्माण झाले. खोसकर गिरणारे आणि गोवर्धन गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले आहेत. हा भाग इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर मतदारसंघाचे शेवटचे टोक आहे. त्र्यंबकेश्‍वरसह या भागाकडे निर्मला गावित यांनी लक्ष दिले नाही म्हणून हा भाग त्यांच्यावर नाराज आहे. आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. त्यामुळे खोसकर यांनी तिकिटाची  खात्री मिळाल्यानेच राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये स्थलांतर केले असणार हे उघड आहे. त्यामुळे आघाडीला तगडा उमेदवार मिळाला आहेच. शिवाय आजही खुद्द शिवसेनेतून गावित यांच्याविषयी नाराजी आहे. कार्यकर्ते बोलून दाखवत नसले तरी त्यांनी तसे संकेत दिले आहेत. सेना असो वा भाजपा किंवा अन्य पक्ष असोत, उघड बंडखोरीपेक्षा ही छुपी नाराजी अधिक धोकादायक असते. हे चित्र इतरही ठिकाणी दिसणार आहे. नाशिक मध्य मतदारसंघात देवयानी फरांदे यांना वसंत गिते यांचे आव्हान आहे. 

पश्‍चिममध्ये सीमा हिरे यांच्या उमेदवारीस दिनकर पाटील यांचा विरोध आहे. पूर्वमध्ये बाळासाहेब सानप यांची उमेदवारी कापली गेली, असे छातीठोकपणे सांगणारे अनेक आहेत. या मतदारसंघात तर भाजपाकडे उद्धव निमसे, सुनील आडके, सुनील केदार, सुनील बागूल, गुट्टे महाराज अशी इच्छुकांची संख्या फार मोठी आहे. सेनेतूनही या जागेची आणि इतरही जागांची अनेकांनी तयारी केली आहे. तीच गोष्ट भाजपाची. निफाड, सिन्नर, देवळालीत भाजपाचे अनेक जण इच्छुकच नव्हे तर पक्षाने आदेश दिल्यास सज्ज आहेत. सत्तेचा गूळ आहे म्हटल्यावर मुंगळे जमणारच. मात्र जेवढे इच्छुक जास्त तेवढी बंडखोरीची भीती जास्त आणि मतांची फाटाफूट होण्याचीही शक्यता अधिक. ही मतांची फाटाफूटच कोणाचे भवितव्य घडवणार आणि बिघडवणार हे आता थोड्याच दिवसांत दिसेल. कारण युतीवाले ‘आमचं ठरलंय’ असे सांगत असले तरी डोळे उघडे ठवून सगळं पाहणार्‍या जनतेचंच अजून नाही ठरलंय. तीच काय ते ठरवेल!