Wed, Jul 08, 2020 19:50होमपेज › Nashik › दुचाकींची चोरी करणारी टोळी गजाआड

दुचाकींची चोरी करणारी टोळी गजाआड

Published On: Apr 05 2019 7:35PM | Last Updated: Apr 05 2019 7:35PM
धुळे : प्रतिनिधी

धुळे आणि नाशिक जिल्हयातून दुचाकींची चोरी करणारी टोळी धुळे शहर पोलिसांनी गजाआड केली आहे. अटक केलेल्‍यांकडून तब्‍बल ११ लाख रुपये किमतीच्या ३२ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळक्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याची माहीती पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे व अपर पोलिस अधिक्षक डॉ. राजू भुजबळ यांनी दिली आहे.

धुळे शहर पोलिस ठाण्यात या गुन्हयाची माहीती देण्यासाठी पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह पोलिस निरीक्षक गणेश चौधरी उपस्थित होते. यावेळी पोलिस अधिक्षक पांढरे यांनी गुन्हयाची माहीती सांगीतली. धुळे शहरातील न्यायालय, जिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालय तसेच अन्य भागातून मोठया प्रमाणावर दुचाकीची चोरी होण्याच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलिस ठाण्यात गुन्हे देखिल झाले आहेत. या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी चोरी झालेल्या भागातील सिसीटीव्हीचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्‍यात या संशयितांचे चेहरे स्‍पष्‍ट दिसत होते. त्यानुसार त्यांचा शोध घेणे सुरु होते. पण अन्य पोलिस ठाण्यांमधे या गुन्हेगारांचे फोटो नसल्यामुळे त्यांचे पोलिस रेकॉर्ड नसल्याने पोलिसांना चोरट्यांना ताब्यात घेण्यास मोठ्या अडचणी येत होत्या. त्यामुळे धुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश चौधरी यांनी उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिरालाल बैरागी, नाना आखाडे, मुख्तार मन्सुरी, प्रकाश पाटील, पंकज खैरमोडे, राहुल पाटील, प्रल्हाद वाघ, कबीर शेख, सतिष कोठावदे यांचे पथक तयार करुन तपास सुरु केला. या पथकाने शहरातील दुचाकी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गॅरेज चालकांवर लक्ष केंद्रीत केले. यात धुळे तालुक्यातील उभंड येथील दिनेश मधुकर वाघ दुचाकी विक्रीचा धंदा मोठया प्रमाणात करीत असल्याचे दिसून आले. तसेच दिनेश व त्याच्या काही मित्रांच्या दैनंदिन रहाणीमानात देखिल बदल झाल्याची माहीती पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी दिनेश वाघ याला ताब्यात घेवून चौकशी करण्यास सुरुवात केली. यातून त्याच गावातील सतिष आनंदा वाघ याचे नाव देखिल समोर आले. या दोघांनी प्राथमिक चौकशीत दुचाकी चोरीच्या काही गुन्हयांची माहीती दिली. पोलिस कोठडीत या दोघा चोरट्योकडून नाशिक जिल्हयातील चोरीची माहीती देखील समोर आलर. त्यानुसार नाशिकच्या चैतन्य सोसायटीत रहाणारा आशिष राजेंद्र शर्मा याला ताब्यात घेवून चौकशी करण्यात आली.

या टोळक्याने धुळे व नाशिक जिल्हयातून दुचाकी चोरी करुन या गाडया उभंड येथील सतिष वाघ व दिगंबर मोहीते यांच्या मदतीने विक्री केल्या होत्या. या गाडया धुळे शहरासह मालेगाव, सटाणा तसेच अन्य भागातून जप्त करण्यात आल्या आहेत. या चोरटयांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी धुळे शहर पोलिस ठाण्यात संपर्क करुन आपली चोरी झालेली दुचाकीचे कागदपत्र दाखवून कायदेशीर प्रक्रीया करुन दुचाकी ताब्यात घेण्याचे पोलिसांनी आवाहन यांनी केले आहे.