Tue, Jun 02, 2020 13:56होमपेज › Nashik › तुकाराम मुंढेंच्या विरोधातील अविश्वास प्रस्‍ताव मागे घ्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंढेवरील अविश्वास प्रस्ताव मागे घ्या: मुख्यमंत्री

Published On: Aug 31 2018 11:11AM | Last Updated: Aug 31 2018 1:58PMनाशिक : पुढारी ऑनलाईन

महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्‍ताव अखेर मागे घेण्याचे निश्तिच झाले आहे. सामाजिक संघटना आणि सोशल मीडियाकरांनी मुंढे यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुंढेंच्या विरोधातील अविश्वास प्रस्‍ताव मागे घेण्याचे निर्देश दिले. उद्या (१ सप्टेंबर) होणार्‍या महासभेत अविश्वास प्रस्‍ताव मागे घेण्यात येईल, असे महापौर रंजना भानसी यांनी जाहीर केले.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांची नाशिकमधील कारकीर्दही वादग्रस्‍त ठरली आहे. त्यांच्या घरपट्टी करात वाढीच्या प्रस्‍तावाला सत्ताधारी भाजपसह विरोधी नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळेच मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्‍ताव आणण्यात आला. १ सप्‍टेंबर रोजी त्यासाठी महासभा होणार होती. परंतु, नाशिकमधील जनता आणि सोशल मीडियावरून मुंढे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनीही मुंढे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेत सत्ताधारी भाजपला अविश्वास मागे घेण्याचे आदेश दिले. 

आम्‍ही नाशिककर संघटनेच्या वतीने 'रन फॉर कमिशनर'

आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सर्व पक्ष एकवटले असतानाच नाशिकच्या जनतेने त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. सोशल मीडियावरून पाठिंबा दर्शवितानाच लोक रस्‍त्यावर उतरले. आम्‍ही नाशिककर संघटनेच्या वतीने आज शहरातून 'रन फॉर कमिशनर'चे आयोजन करण्यात आले.

तुकाराम मुंढेंनी ५० टक्के करवाढ कमी केली

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लागू केलेल्या करवाढीविरोधात सत्ताधारी भाजपाने थेट आयुक्तांविरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर मुंढे खुर्ची वाचविण्यासाठी काहीसे नरमले असून, त्यांनी गुरुवारी शुद्धीपत्रक काढत करयोग्य मूल्य दरात सुमारे ५० टक्‍के  मागे कपात करत असल्याचे जाहीर केले. तसेच, याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतल्याचा दावाही केला आहे.