Sat, Nov 28, 2020 19:22होमपेज › Nashik › नाशिकः आगपेटीने भरलेला ट्रक जळून खाक

नाशिकः आगपेटीने भरलेला ट्रक जळून खाक

Published On: Dec 17 2017 2:58PM | Last Updated: Dec 17 2017 2:59PM

बुकमार्क करा

जळगाव : वार्ताहर

मनमाड-मालेगाव रस्त्यावरील चोंढी शिवारात आगपेटीने भरलेल्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने आगपेटीसह ट्रक जळून खाक झाल्याने सुमारे 38 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र यात सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.

तामिळनाडू राज्यातील नामक्कल येथून जयपुर येथे ट्रक (क्रमांक टीएन 34 डब्ल्यू 4786) आगपेट्या घेऊन जात होता. हा ट्रक मनमाड-मालेगाव महामार्गावरील जळगाव चोंढी शिवारात आला असता ट्रकच्या पाठीमागून धुर निघत असल्याचे वाहन चालक युवराज नामक्कल याच्या लक्षात आले. त्याने ट्रक थांबवून पाहत असतानाच आगपेटीने भरलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला. यावेळी तालुका पोलीस ठाणे व अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी दोन ते तीन तास अथक प्रयत्न करुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. 

ट्रक पेटल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. आग आटोक्यात आल्यानंतर वाहतुक पूर्ववत करण्यात आली. या आगीत ट्रकमध्ये असलेल्या 21 टन आगपेट्यासह ट्रक जळून खाक झाला. यात 18 लाख रुपयांच्या आगपेट्या व 20 लाख रुपयांची ट्रक जळून सुमारे 38 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुपारपर्यंत काही प्रमाणात आग व धुर निघत असल्याने पुन्हा अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले होते. दुपारपर्यंत पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

ग्रामस्थांनी उचलून नेल्या आगपेट्या

तामिळनाडू राज्यातील नामक्कल येथून जयपुर येथे 21 टन आगपेट्या घेऊन जाणारा ट्रकने अचानक जळगाव चोंढी शिवारात पेट घेतल्याची वार्ता परिसरात पसरताच बघ्यांनी गर्दी केली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवल्यानंतर बघ्यांनी ट्रकच्या बाहेर पडलेल्या आगपेट्या घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.