Wed, Jun 03, 2020 07:44होमपेज › Nashik › पंचवटी : गुन्हेगाराची पोलिसांनी काढली धिंड(Video)

पंचवटी : गुन्हेगाराची पोलिसांनी काढली धिंड(Video)

Published On: Mar 02 2018 4:33PM | Last Updated: Mar 02 2018 5:57PMपंचवटी : देवानंद बैरागी 

गुन्हेगाराची ज्या भागात दहशत आहे, तेथेच त्याची धिंड काढत पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक बसवण्याचा प्रयत्न येथे केला. सुनील चांगले या सराईत गुन्हेगाराने येथील क्रांतीनगर, हनुमानवाडी, मोरेमळा, ड्रीमकॅसल आदी ठिकाणी दहशत माजवली होती. पोलिसांनी आज (शुक्रवार) दुपारी त्याची या परिसरातून धिंड काढत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना इशारा दिला. 

ढकांबे येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुनील विलास चांगले आणि त्याचा साथीदार विकी उर्फ आशुतोष बाळासाहेब सानप या दोघांना पंचवटी पोलिसांनी अटक केली होती. चंदीगढ एक्स्प्रेसमध्ये चालत्या गाडीत रत्नागिरी ते पनवेल या दरम्यान संपूर्ण रेल्वेत झडती घेत फिल्मी स्टाईलने विकी सानप याला पनवेल येथे ताब्यात घेतले होते. 

त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने आपला साथीदार सुनील चांगले हा द्वारका येथील हॉटेल अविनाश इनमध्ये लपून बसला असल्याचे सांगितले. यावर उपनिरीक्षक इंगोले यांनी लागलीच नाशिकच्या दुसऱ्या पथकाला फोन करून द्वारका येथील हॉटेलमधून सुनील चांगले याला ताब्यात घेतले होते. 

या दोघांना अटक करून नाशिक न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पंचवटी पोलिसांनी आज दुपारी सुनील चांगले याची दहशत परिसरातून धिंड काढली. 

यावेळी वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले, उपनिरीक्षक महेश इंगोले गुन्हे शोध पथकाचे बाळू ठाकरे, प्रभाकर पवार, संतोष काकड, संदीप शेळके, सुरेश नरवडे, बाळू शेळके, बाळासाहेब मुर्तडक महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी परिसरात राहत असलेल्या सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवे याच्या घराची देखील झडती घेण्यात आली. यानंतर पोलीस ठाण्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनील चांगले समर्थकांनी पोलिसांना आव्हान देणारे तसेच परिसरात हत्यासत्र करणार असल्याचे मॅसेज व्हायरल केले होते. त्यामुळे चांगले समर्थकांना पोलिसांनी उचलून त्यांची चांगलीच धुलाई केली. यापुढे पोलिस या गुन्हेगारांना अर्थ सहाय्य करणारे राजकारणी, बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्या समर्थकांवर आपले लक्ष केंद्रित करणार असून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी दिली.