Tue, May 26, 2020 10:58होमपेज › Nashik › लाच मागणाऱ्या परीरक्षण भूमापक एसीबीच्या जाळ्यात

लाच मागणाऱ्या परीरक्षण भूमापक एसीबीच्या जाळ्यात

Published On: Dec 19 2018 7:42PM | Last Updated: Dec 19 2018 7:42PM
जळगाव : प्रतिनिधी

रेकॉर्ड मधील चुकीचे नाव दुरुस्त करुन देण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या जळगाव नगर भूमापन कार्यालयातील परीरक्षण भूमापक संगीता सकलाल वर्दे ( वय ४५) यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागने अटक केली. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भूमापन कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. 

रेकॉर्डमधील तक्रारदाराच्या आजीच्या नावात झालेली चुक दुरुस्त करून सुधारीत उतारा देण्यासाठी १० हजारांची मागणी वर्दे यांनी केली होती. या कारवाईने भूमापन विभागातील लाचखोर कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने कारवाई

३७ वर्षीय तक्रारदाराच्या आजीच्या नावात दुरुस्ती करण्यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज करण्यात आला होता. २२ ऑक्टोबर रोजी आरोपी तथा जळगाव भूमापन कार्यालयातील परीरक्षण भूमापक संगीता वर्दे यांनी दहा हजारांची मागणी केली होती. लाचेची मागणी झाल्याचा पुरावा एसीबीला मिळाल्यानंतर बुधवारी कार्यालयातूनच वर्दे यांना अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी व सहकार्‍यांनी केली.