होमपेज › Nashik › शस्त्रसाठा प्रकरणी तपास यंत्रणांची धावपळ

शस्त्रसाठा प्रकरणी तपास यंत्रणांची धावपळ

Published On: Dec 17 2017 12:04AM | Last Updated: Dec 17 2017 12:04AM

बुकमार्क करा

ओझर : वार्ताहर

राज्याला हादरवून सोडणार्‍या चांदवड येथे सापडलेल्या शस्त्रसाठ्यातील मुख्य संशयिताला ओझर येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. घटनेच्या अधिक तपासासाठी देशातील मुख्य तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी ओझर येथेच तळ ठोकून असून, या प्रकरणामुळे त्यांची प्रचंड धावपळ उडाली आहे. ओझर पोलीस ठाणे आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, ओझर पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

मालेगाव येथील पेट्रोलपंपचालकाला पिस्तूलचा धाक दाखवित पोबारा करणार्‍या तीन संशयितांना चांदवड येथील टोलनाक्यावर पकडण्यात आले होते. या संशयितांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यातीलच एका मुख्य संशयिताला ओझर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी देशातील विविध गुप्तचर यंत्रणा, सुरक्षा यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी येेथे तळ ठोकला असून, यात दहशतवादविरोधी पथक, इंटेलिजन्स ब्युरो, राष्ट्रीय तपास संस्था यांच्यासह उत्तर प्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी ओझर येथे तळ ठोकला आहे. मुख्य संशयिताला येथील कोठडीत ठेवण्यात आल्याने ओझर पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शस्त्रधारी पोलीस कमांडोंचा जागता पहारा पोलीस ठाण्याच्या आवारात सज्ज आहे. पोलीस ठाण्यात येणार्‍या प्रत्येकाची कसून चौकशी, सोबतच कडक तपासणी करण्यात येत होती. तसेच माध्यम प्रतिनिधींनाही ठाण्यात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.