Mon, Sep 28, 2020 14:16होमपेज › Nashik › मालेगावी सामंजस्यातून मंदिरे हटविली

मालेगावी सामंजस्यातून मंदिरे हटविली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मालेगाव : प्रतिनिधी

धार्मिक स्थळ हटविण्याला तीव्र विरोध होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याबाबतचा खास प्रशासकीय बागुलबुवा मालेगावकरांनी फोल ठरवून अती संवेदनशीलतेचा शिक्का मारणार्‍या व्यवस्थेला चपराक दिली. न्यायालयीन आदेशाचा मान राखत भायगाव शिवारातील आजोंद्याबाबा मंदिर महापालिका अधिकार्‍यांच्या संयमी भुमिकेमुळे निष्कासित झाले. तर, शहराच्या अत्यंत वर्दळीच्या मोसम पूलवरील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शनि मंदिर व हनुमान मंदिरातील मूर्ती स्वत: व्यवस्थापकांनीच हटवून घेत इतरांपुढे आदर्श ठेवला.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळ निष्कासित करण्याची कार्यवाही 17 नोव्हेंबरपासून सुरू होती. पहिल्या दिवशी आठपैकी पाच मंदिर सामंजस्याने हटविली गेलीत. उर्वरित तिघा मंदिर काढण्यास ट्रस्टींसह भाविकांचा विरोध लक्षात घेऊन साधारण आठवडाभर मोहीम थांबविण्यात आली होती. पोलिसांनी शनिवारी बंदोबस्त पुरविण्याची ग्वाही दिल्याने त्यानुसार प्रत्यक्षात कार्यवाहीला सकाळी 10 वाजेला प्रारंभ झाला. पहिला मोर्चा भायगावमधील आजोंद्याबाबा मंदिराकडे वळविण्यात आला. याठिकाणी काहींनी जर-तर ची भूमिका मांडत प्रशासनाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मंदिरासाठी भाजप नेते डॉ. अद्वय हिरे यांनी दिलेल्या कृषी तंत्र विद्यालयाच्या जागेत विटा, दगड, वाळू आणण्यात येऊन पाया भरणीला प्रारंभ झाला. सहाय्यक आयुक्त राजू खैरनार यांनी पुढाकार घेत मंदिरालगतचे बांधकाम व पोल काढून घेतले. मूर्तींची विधिवत पूजाअर्चा होऊन पाऊणे दोन वाजता मूर्ती हलवण्यात आली. परंतू, संबंधितांनी मूर्ती व दानपेटी ताब्यात घेण्यास नकार दिला. दानपेटीचा पंचनामा करण्यात येऊन मूर्ती शासकीय वाहनातून प्रभाग एकच्या कार्यालयातील खोलीकडे रवाना करण्यात आली. त्यापाठोपाठ जेसीबीच्या सहाय्याने 15 मिनिटात मंदिर निष्कासित करत बांधकाम साहित्य उचलून घेण्यात आले.

विनासायास कारवाई पूर्ण झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्‍वास सोडत सर्व अधिकारी यंत्रणेसह प्रभाग एकच्या कार्यालयात परतले. भायगावमधील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या शनि मंदिराजवळ गर्दी वाढत गेली. परंतू, कोणत्याही प्रशासकीय अधिकार्‍याविना मंदिराच्या व्यवस्थापकांनी स्वयंस्फूर्तीने मूर्ती हलविण्यास प्रारंभ केला होता. तीन वाजेपासून भाविक-कार्यकर्त्यांनी मंदिरावरील शेड, फरशा, कुंड आदी काढत साहित्य जवळील शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या आवारात ठेवले. चार वाजता विविधत पूर्जा, सामुहित आरती होऊन मूर्तीभोवतीचे बांधकाम तोडण्यास प्रारंभ झाला. हनुमान मंदिराची मूर्ती मालवाहू ट्रॅक्समध्ये ठेवत ती स्वप्नपूर्ती नगरमधील गणेश मंदिरात स्थलांतरीत करण्यात आली. तोपर्यंत शनि मंदिरातील शिळादेखील खुली झाल्याने वस्त्रात ठेवत ती मूर्तीही रवाना केली गेली. याठिकाणी पोलिस उपअधीक्षक अजित हगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता. परंतू, कुणाचाच कारवाईला विरोध नसल्याने प्रशासनाला केवळ वाहतूक सुरळित ठेवण्याचीच तेवढी जबाबदारी पार पाडावी लागली. उपविभागीय अधिकारी अजय मोरे यांनी पाहणी करून ट्रस्टी, भाविकांच्या सकारात्मक भूमिकेचा कौतुक केले.