Fri, Jul 10, 2020 08:32होमपेज › Nashik › मी सुरू केलेली यात्रा मला मुख्यमंत्री व्हायचे म्हणून नाही..!

मी सुरू केलेली यात्रा मला मुख्यमंत्री व्हायचे म्हणून नाही..!

Published On: Jul 21 2019 1:26AM | Last Updated: Jul 20 2019 11:24PM
सिन्‍नर : प्रतिनिधी

मी सुरू केलेली यात्रा शिवसेनेचे सरकार आणण्यासाठी किंवा मला मुख्यमंत्री व्हायचे म्हणून काढलेली नाही. तर परक्यांना आपलेसे करायचे आणि आपल्या लोकांचे आशीवार्द घेऊन पुढे वाटचाल करीत जनतेच्या मनातील नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी ही यात्रा निघाली आहे, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जन आशीर्वाद यात्रेअंतर्गत येथील नर्मदा लॉन्सवर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, संजय बच्छाव, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, शहरप्रमुख गौरव घरटे, उदय सांगळे आदी उपस्थित होते.

जनताजनार्दन माझा देव आहेे, त्यामुळे तीर्थयात्रेप्रमाणे जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलो आहे. सत्ता मिळाल्यानंतर लोक कार्यालयांमध्ये खुर्च्या टाकून बसतात. पण शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, जो सरकारमध्ये असो नसो जनतेच्या प्रश्‍नावर रस्त्यावर उतरलेला असतो. त्यामुळेच महाराष्ट्रात सगळ्यांनी एकत्र येऊन शिवसेनेला साथ द्यावी, असे आवाहन ठाकरे यांनी केले. आमदार राजाभाऊ वाजे यांचे कार्य शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या ब्रीदवाक्याप्रमाणेच असल्याचे सांगून गौरव केला. शेतकरी, सामान्यांबरोबरच पावसानेदेखील आदित्य ठाकरे यांच्या आगमनाला शुभाशीर्वाद दिले असल्याचे सांगत ना. भुसे यांनी शिवसेनेला अभिप्रेत काम सिन्‍नरमध्ये सुरू असल्याचे नमूद केले. महाराष्ट्रात सध्या आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, असाच कौल असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, ना. सांगळे, उदय सांगळे आदींसह पदाधिकार्‍यांची भाषणे झाली. यावेळी शिवसैनिकांसह तालुक्यातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.