Mon, Jun 01, 2020 07:17होमपेज › Nashik › नाशिक जिल्ह्यात दर महिन्याला एक सर्पदंश

नाशिक जिल्ह्यात दर महिन्याला एक सर्पदंश

Published On: Jul 14 2019 2:24AM | Last Updated: Jul 14 2019 12:35AM
नाशिक : प्रतिनिधी

चालू वर्षात जानेवारी ते जूनअखेरीस जिल्ह्यात 325 जणांना सापाने चावा घेतला. पैकी  सात जणांना मृत्यू ओढवला. दरमहा सरासरी एकाचा सर्पदंशाने मृत्यू होत आहे. चालू वर्षात जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सर्पदंशाचे 325 रुग्ण जिल्हाभरातून दाखल झाले होते. सर्पदंशाचे प्रकार आदिवासी तसेच ग्रामीण भागात अधिक घडतात. प्रामुख्याने शेतात मशागतीची कामे करताना, गवत कापताना, मुलांना खेळताना, घरात झोपलेल्यांनाही सर्पदंशाचे प्रकार घडले आहेत. जमिनीवर त्यामुळेच झोपू नये. बाज, खाट वापरावी.

पावसाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण वाढत असल्याचे दरवर्षी निदर्शनाला येते. सापांचा नैसर्गिक अधिवास पाण्यामुळे धोक्यात येतो आणि सापांना पर्याय शोधावा लागतो. नाशिक परिसरात पावसाचा जोर वाढल्याने सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरलेले आहे. अडगळीचे ठिकाण, शेतात, घरात साप निवार्‍यासह खाद्याच्या शोधात फिरत आहेत. रात्री बाहेर पडताना बॅटरी सोबत असावी, यासह अन्य प्रकारच्या सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.  

लस सर्वत्र उपलब्ध  

ग्रामीण, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीचा पुरवठा वेळेवर होत आहे. मे महिन्यातच मागणीनुसार शासनाकडून लसीचा साठा मागवण्यात येतो. त्यामुळे जिल्ह्यात सर्पदंश झालेल्यांना तातडीने उपचार मिळत आहेत. सर्पदंशानंतर रुग्णावर तातडीने प्रथमोपचार करावेत आणि जवळच्या रुग्णालयात न्यावे. सर्पदंशाच्या जागेवर कुठेही ब्लेडने कापणे, जखम चोखणे असे प्रकार टाळावेत. 

- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक