Mon, Nov 18, 2019 20:33होमपेज › Nashik › टिप्पर गँगकडून माजी नगरसेवक ठाकरे यांना धमकी

टिप्पर गँगकडून माजी नगरसेवक ठाकरे यांना धमकी

Published On: Jan 21 2019 6:10PM | Last Updated: Jan 21 2019 6:02PM
सिडको :  प्रतिनिधी

टिप्पर गॅंगकडून माजी नगरसेवक मामा ठाकरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात मामा ठाकरे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माजी नगरसेवक बळीराम रामभाऊ ठाकरे यांचे शुभम पार्क परिसरात स्टँडर्ड वाईन शॉप नावाने दुकान आहे. रविवार दि. २० रोजी दुपारी ३ वाजता निखिल बाळू पगारे (रा. राजरत्ननगर, नवीन नाशिक) याने सदर दुकानात येऊन दारूच्या दोन बाटल्या घेतल्या. दुकानातील कर्मचाऱ्यांनी पैशांची विचारणा केली असता निखिल पगारे याने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करत धमकी दिली.

हा प्रकार मामा ठाकरे यांना कळताच त्यांनी निखिल पगारे याच्याशी फोनवरून संपर्क साधला असता पगारे याने, "तू मला ओळखत नाही का?  मी टिप्पर गॅंगचा माणूस आहे, तुला धंदा करायचा असेल तर ताबडतोब १ लाख रुपये पाठवून दे, नाहीतर तुझा गेम करून टाकेन" अशी धमकी दिली.

या प्रकारानंतर मामा ठाकरे यांनी अंबड पोलिस ठाण्याशी संपर्क साधून सोमवार दि.२१ रोजी संशयित निखिल पगारे याच्या विरोधांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरेश्वर घुगे करीत आहेत.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही व्यापारी, व्यवसायिकांकडे कोणीही धाक अथवा धमकी देऊन खंडणी मागत असेल तर सबंधितांनी घाबरून न जाता अंबड पोलिसांशी संपर्क साधावा, अशा गुन्हेगारांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असे वरिष्ठ पोलिस निरीक्षकानी सांगितले.