Wed, Jul 08, 2020 20:37होमपेज › Nashik › भुजबळांच्या घरवापसीवर संजय राऊत म्हणाले...

भुजबळांच्या घरवापसीवर संजय राऊत म्हणाले...

Published On: Sep 04 2019 6:11PM | Last Updated: Sep 04 2019 6:53PM

छगन भुजबळ आणि संजय राऊतमुंबई : पुढारी ऑनलाईन 

लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा आणि शिवसेना युतीमधील विधनासभेचा फॉर्म्युला ठरला आहे. यामुळे कोणी कितीही आणि काहीही वल्गना केल्या, तरी त्याला काही अर्थ नाही. दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक एकत्र बसून योग्य तो निर्णय घेतील, अशी माहिती शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (दि.4) पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रवेशाविषयी त्यांना विचारले असता ते आहे तिथेच खुश आहे, असे खुद्द भुजबळांनीच सांगिल्याने त्यांच्या प्रवेशाविषयी मी बोलणे योग्य होणार नाही, असे सांगत खासदार राऊत यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले.

बुधवारपासून (4) दोन दिवसांच्या दौर्‍यावर संजय राऊत आले आहेत. येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी विधानसभा मतदार संघनिहाय कामकाजाचा आढावा घेतला. गणेश विसर्जनानंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. यामुळे त्यापूर्वी सर्व शिवसैनिक व पदाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी स्पष्ट करत हेच म्हणणे शिवसेना पक्षप्रमूख उध्दव ठाकरे यांच्यापुढे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या आजच्या बैठकीत छगन भुजबळ हा चर्चेचा विषयच नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते ज्येष्ठ नेते आहेत. आणि दुसर्‍या पक्षातील नेत्याविषयी चर्चा करण्याचे काही कारणच नाही, असे सांगून खासदार राऊत यांनीही भुजबळ यांच्याविषयी बोलणे टाळत त्यांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मी आहे तिथेच खुश आहे, अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने ते आपण गांभिर्याने घेतले असून, त्यांच्या भावनेचा आपण सन्मान केला पाहिजे. यामुळे त्यांच्या प्रवेशाविषयी मला विचारण्याऐवजी त्यांनाच विचारणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

आढावा बैठकी दरम्यान येवला विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी भुजबळांच्या प्रवेशाला जोरदार विरोध केला असून, भुजबळांना शिवसेनेत प्रवेश देणार नसल्याचे तुम्ही संबंधितांना आश्वासन दिले आहे का असा प्रश्न विचारला असता शिवसैनिकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मात्र बैठकीचा भुजबळ हा विषयच नसल्याने त्याविषयी चर्चाच झाली नसल्याचा दावा शिवसेना नेते खासदार राऊत यांनी करत त्यावर अधिक बोलणे टाळले. पक्षाच्या वाईट काळात आणि ज्यांनी पक्षासाठी लाठ्या काठ्या खाल्ल्या त्यांना पक्ष कधीही वार्‍यावर सोडणार नाही. कार्यकर्त्यांच्या भावना महत्वाच्या असून, त्या जपल्या जातील, असे सूचक वाक्यही त्यांनी येवला मतदार संघाच्या प्रश्नानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

पक्ष प्रवेशाविषयी त्यांना विचारले असता प्रवेश देणार्‍यांना निरखून पारखूनच घेतले जात आहे. यामुळे पक्ष काही वॉशिंग मशिन नाही की कुणालाही सहज प्रवेश दिला जाईल. जिथे आमची ताकद कमी पडत आहे अशाच ठिकाणी बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल. जिथे आमची ताकद आणि उमेदवार मजबूत असेल त्याठिकाणी इतर कुणाला उमेदवारी देण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.