होमपेज › Nashik › सातवा तर सोडाच, पण ‘सहाव्या’चेही वेतन नाही

सातवा तर सोडाच, पण ‘सहाव्या’चेही वेतन नाही

Published On: Jul 18 2019 1:56AM | Last Updated: Jul 17 2019 11:25PM
नाशिक : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत मुख्यालयातील कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जात असताना दुसरीकडे तालुकास्तरावर काम करणार्‍या विशेषत: आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना मात्र सातव्या तर सोडाच पण, सहाव्या वेतन आयोगानुसारही वेतन मिळालेले नाही. सध्या हा विभाग वार्‍यावर असून कर्मचार्‍यांचे मासिक बजेट कोलमडले आहे.

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा सरकारने केली. जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना मात्र या वेतन आयोगासाठी जुलै महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. जून महिन्याचे वेतन जुलै महिन्यात सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात आले. पण, हे वेतन सगळ्याच कर्मचार्‍यांना मिळाले नसल्याचे उघड झाले आहे. जे कर्मचारी मुख्यालयात कार्यरत आहेत, त्यांनाच या वेतन आयोगाचा लाभ झाल्याचे पुढे आले आहे. तालुकास्तरावर काम करणार्‍या मात्र अद्यापही या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे.  बहुतांश कर्मचार्‍यांना तर सहाव्या वेतन आयोगानुसारही वेतन मिळालेले नाही. विशेषत: आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांचा यात समावेश आहे. वेतन देयके यापूर्वीच सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जर सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देणे शक्य नसेल तर सहाव्या वेतन आयोगानुसार तरी द्या, अशी आर्जव या कर्मचार्‍यांनी केली आहे. पण, जुलै मध्यावर आलेला असतानाही जूनचे वेतन झालेच नाही. नेहमीच वेतन मिळण्यास विलंब होत असल्याने कर्मचार्‍यांचे मासिक बजेट कोलमडले आहे. घर,विमा,वाहनाचेही हफ्ते थकले असून दंडापोटी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. उधारउसनवारीवर घरखर्च भागवावा लागत असल्याची कैफियत काही कर्मचार्‍यांनी मांडली आहे. प्रभारी खातेप्रमुखांमार्फत कारभार हाकला जात असलेल्या आरोग्य विभागाची घडी विस्कटली आहे. याचा त्रास मात्र सामान्य कर्मचार्‍यांना सहन करावा लागत आहे.