Tue, Jun 02, 2020 15:04होमपेज › Nashik › खंडणी व दरोडे घालणाऱ्या टोळीचा पदार्पाश

खंडणी व दरोडे घालणाऱ्या टोळीचा पदार्पाश

Published On: Jun 05 2019 6:33PM | Last Updated: Jun 05 2019 6:33PM
धुळे : प्रतिनिधी   

मुंबई, ठाणे व रत्नागिरी परिसरात खंडणी व दरोडे घालणा-या टोळीला धुळ्यातील औद्योगिक वसाहतीनजीक आज मोहाडी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने गजाआड केले. या टोळीतील अनेकांवर मुंबईमधे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हे केल्याची शक्यता आज उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी व्यक्त केली आहे.

धुळे शहरात महामार्गावरुन कुख्यात गुंडांची टोळी मोठा गुन्हा करण्याच्या उददेशाने जाणार असून हॉटेलवर जेवण घेणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांना ही माहीती दिली. यानंतर महामार्गावर गस्त वाढवत गाडयांची तपासणी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना औदयोगीक वसाहतीजवळील बालाजी प्लाय कंपनीजवळ इनोव्हा ( क्रमांक एमएच ०३ एएम ८५६२) गाडी उभी दिसल्याने पोलिस पथक तपासणी करण्याच्या उद्देशाने या गाडीच्या दिशेने जाताच ही गाडी भरधाव वेगाने टोल नाक्याच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. परिणामी पोलिस पथकाने पाठलाग करुन या गाडीस अडवले. 

यावेळी तपासणी केली असता गाडीमधून देशी बनावटीचे दोन पिस्तूल, दोन जिवंत काडतूस, एक तलवार व एक चाकू असे हत्यारांसह मिरची पूड व दोर अशा वस्तू सापडल्या. तर या गाडीतून मुंबई येथील अमित नामदेव पाटील, अभिषेक अरुण ढोबळे, पंकज सुरेश साळुंखे, जितेश पुखराज ललवाणी, विकास कांतीलाल लोंढे, मंगेश कृष्णा भोईर, रविंद्र सुरेश चव्हाण अशा सात जणांना ताब्यात घेवून मोहाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या तरुणांची चौकशी करताच त्यानी खंडणी, दरोडा, यासारखे २० पेक्षा जास्त गुन्हे ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागीरी याठिकाणी केल्याची माहीती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. 

मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या शहरांत अशाच प्रकारचे लुटीचे गुन्हे करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचेही तपासात पुढे आले आहे. या सर्व तरुणांकडून गाडीसह सुमारे दहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.