Tue, Jun 02, 2020 14:40होमपेज › Nashik › सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटल्याने चार जखमी

सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटल्याने चार जखमी

Published On: Aug 21 2019 1:35AM | Last Updated: Aug 20 2019 11:15PM
जळगाव : प्रतिनिधी

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सेंट्रल बँकेत सुरक्षारक्षकाकडून बंदुकीतून गोळी सुटल्याने तीन महिलांसह एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.20) घडली. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून, या सर्वांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर जखमींच्या नातेवाइकांनी संताप व्यक्‍त केल्याने पोलिसांनी सुरक्षारक्षकास अज्ञातस्थळी हलवले आहे.

वरणगाव येथील सेंट्रल बँकेत मंगळवारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुरक्षारक्षक लालचंद चौधरी (रा. तापीनगर, भुसावळ) यांच्याकडे असलेली डबल बोअरची बंदूक (रायफल) लॉक झाल्याने ते लॉक काढण्याच्या प्रयत्नात असताना त्यांचे ट्रिगरवर बोट पडल्याने गोळी सुटून ती जवळच असलेल्या प्रमिला वसंत लोहार (रा. तळवेल), शोभा प्रकाश माळी (वरणगाव) व कलाबाई चौधरी (रा. वरणगाव) व राधेश्याम छबीलदास जैस्वाल (रा. वरणगाव) यांच्या पायांना लागली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बँकेत एकच खळबळ उडाली. ही माहिती गावात पसरताच नागरिकांनी बँकेकडे धाव घेतली. तर वरणगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीपकुमार बोरसे, हवालदार सुनील वाणी, राहुल येवले, शेळके, कुलकर्णी आदींनीही धाव घेत जमावाला शांत केले. नलू इंगळे यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गोळीबारानंतर बँकेतील व्यवहार ठप्प झाले आहेत.