होमपेज › Nashik › एसटीच्या स्मार्ट कार्डांचा तुटवडा

एसटीच्या स्मार्ट कार्डांचा तुटवडा

Published On: Jul 19 2019 2:17AM | Last Updated: Jul 19 2019 12:29AM
नाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी दिल्या जाणार्‍या स्मार्ट कार्डचा सध्या तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या ज्येष्ठांना स्मार्ट कार्डसाठी डिसेंबरपर्यंतची वाट पाहावी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नोंदणीपैकी केवळ 25 टक्के ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड वितरित करण्यात आल्याचे समजते.

राज्यभरात एप्रिलपासून एसटी प्रशासनाने प्रवाशांसाठी खास स्मार्ट कार्ड योजना कार्यन्वित करण्यात आली होती. स्मार्ट कार्ड हे सवलत आणि प्रवासी कार्ड अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. ठराविक रकमेचे स्मार्ट कार्ड घेऊन त्याद्वारे त्या रकमेइतका प्रवास साधी, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी आणि अश्वमेध आदी बसमधून करता येणार आहे. 

संपूर्ण राज्यातील स्मार्ट कार्डचे काम एक खासगी कंपनीला देण्यात आले आहे. हैदराबाद येथे स्मार्ट कार्डची छपाई केली जाते. मात्र, संबंधित कंपनी एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये स्मार्ट कार्ड पुरविण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. संपूर्ण प्रणाली नवीन असल्याने तज्ज्ञ कर्मचारी एसटीकडे नाही. त्यातच आधारकार्ड  स्मार्टसोबत संलग्न करतानाही अनेक अडचणी येतात. आधारकार्डचे सर्व्हर वारंवार डाउन होत असल्याने स्मार्ट कार्डच्या प्रक्रियेला विलंब होत आहे. 

दरम्यान, नाशिक विभागात 19 हजार 537 ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी केवळ 25 टक्के ज्येष्ठ नागरिकांना कार्डचे वाटप झाले आहेत. ठक्कर बाजार येथील केंद्रावर गेल्या दीड महिन्यात 970 नागरिकांना स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले आहे. तसेच मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकार (69), अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त (21) आणि आदिवासी मित्र (13) असे 103 व्यक्तींना स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे.