Wed, Jun 03, 2020 09:48होमपेज › Nashik › संत निवृत्तीनाथांच्या रथ मिरवणुकीत ऊसळला जनसागर

संत निवृत्तीनाथांच्या रथ मिरवणुकीत ऊसळला जनसागर

Published On: Jan 12 2018 6:05PM | Last Updated: Jan 12 2018 6:05PM

बुकमार्क करा
ञ्यंबकेश्वर  : ज्ञानेश्वर महाले  

शैव व वैष्णवाच्या वैचारिक समन्वयाचे मुळ केंद्र असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथाच्या पौष वारीसाठी यात्रोत्सवाला राज्यभरातून दिंड्या घेऊन आलेल्या पाच लाखाहून अधिक वारकरी निवृत्तीनाथाच्या चरणी नतमस्तक झाले. हजारो भाविकांनी केलेली ब्रहगीरीची प्रदक्षिणा, नाथांच्या दर्शनासाठी लागलेली लाखो भाविकांची रीघ व सायंकाळी नाथांच्या पादुकांची चांदीच्या रथातून निघालेली भव्य मिरवणूक यामुळे ब्रम्हगिरीच्या कुशीत जणू वैष्णवांचा मिनी कुंभ मेळा भरल्याची आज अनुभूती येत होती. त्र्यंबकेश्वर येथे आज पाच लाख वारकऱ्यांनी हजेरी लावून ज्ञानियाच्या माउलीच्या सदगुरू निवृतीनाथाच्या पायी नतमस्तक झाले.

यंदा यात्रेचे नियोजन करताना नाथाच्या समाधीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. संत निवृत्ती नाथांच्या यात्रेत यंदा प्रथमच विक्रमी ६०० च्या वर दिंड्यांचे आगमन झाले आहे. त्र्यंबक गावच्या चारी बाजूंनी गावाबाहेर दिंड्या उतरल्यामुळे गावात सोबतच परीसरातही भाविकांची गर्दी झाली होती.
नाथांच्या पादुका, प्रतिमेची मिरवणुकीत प्रचंड गर्दी संत निवृत्तीनाथ संस्थानतर्फे तयार करण्यात आलेल्या चांदीच्या रथातून आज सायंकाळी ५ वाजता नाथाच्या पादुका व प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या रथ यात्रेत हजारोच्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाच्या साथीने संत निवृतीनाथाच्या जय घोषणेमुळे संपूर्ण त्र्यंबक नागरी दुमदुमून गेली होती. रथ तेली गल्ली, पाटील गल्ली मार्गे त्र्यंबक राजाच्या मंदिराकडे नेण्यात आली. थे मंदिरात प्रतिमा, पादुका नेण्यात आली. रथाचे मानकरी देहूकर व बेलापूरकर यांचे निवृतीनाथ मंदिरात भजन झाले. तेथून लम्क्षी-नारायण चौकातून रथ यात्रा कुशावर्त मार्गे समाधी मंदिराकडे गेली. यावेळी संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष संजय धोडगे, सचिव पवनकुमार भुतडा, विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, जयंत गोसावी, पुंडलिक थेटे, पंडित कोल्हे, रामभाऊ मुळाणे, डॉ.धनश्री हरदास, ललिता शिंदे, योगेश गोसावी, जिजाबाई लांडे, अविनाश गोसावी, जयंत गोसावी आदी रथा सोबतच होते.

तरुणाच्या मुखी ज्ञानदेव, सोपान मुक्ताईची गजर 
संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिम्मित सहाशे दिंड्या त्र्यंबकमध्ये दाखल झाल्याने संत निवृत्तीनाथाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली, यात राज्यभरातूनच नव्हे तर परदेशातून भाविक दाखल झाले होते, कीर्तन, प्रवचनांनी परिसरात हरिनामाचा गजर, तसेच निवृत्ती, नामदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, तुकारामाचा जयघोष एकू येत होता.यंदाचे वैशिष्टे म्हणजे दिंडीत तरुणाचा लक्षणीय सहभाग होता. दानशूर मंडळीनीं दिंड्यांना मोफत अल्पोहार भोजन दिले, यंदा तरुणांची प्रचंड गर्दी झाली होती. प्रगत तंत्रज्ञानाबरोबर आध्यात्मिक शांतीसाठी संताचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. या विचाराने पाच वर्षापासून अकोला येथूनपायी दिंडीत येत असल्याचे अकोला येथील नितीन पगार यांनी सांगितले.