Tue, Jun 15, 2021 12:40
नाशिक : संजय राऊतांचा तब्बल पाच दिवस मुक्काम! राष्ट्रवादी अन् भाजपला शह देण्यासाठी शिवसेना मैदानात

Last Updated: Jun 11 2021 7:05AM

संग्रहित छायाचित्र
नाशिक; पुढारी वृत्तसेवा : हाती असलेल्या सत्तेतून महाराष्ट्रातील सर्वच महत्त्वाची ठिकाणे काबीज करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणून ओळख असलेल्या भाजपप्रमाणेच आता शिवसेनेनेही निवडणुकीच्या एक दीड वर्षआधीच पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले टाकली असून, पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांचा उत्तर महाराष्ट्रातील दौराही त्याचाच एक भाग आहे. साधारण वर्षापूर्वी शिवसेनेने खा. राऊत यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख पद सोपवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषत: भाजपचा बालेकिल्ला असलेला उत्तर महाराष्ट्र काबीज करण्यासाठी जबाबदारी सोपविली आहे.

नाशिक शहर आणि जिल्हा हा शिवसेनेचा आधीपासूनचा बालेकिल्ला आहेच. मात्र, या बालेकिल्ल्यात आधी मनसेने आणि त्यानंतर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केल्याने ही बाब शिवसेनेसाठी धक्कादायकच ठरली आहे. राज्यातील सत्तांतरामुळे शिवसेनेला बूस्टर मिळाला असून, याच आधारे काही महिन्यांपूर्वीच ना. गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये भाजपच्या हातून सत्ता खेचून आणण्याची कामगिरी बजावली.
यानिमित्ताने शिवसेनेला उत्तर महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात पाय रोवण्यास संधी मिळाली आहे. भाजपमधील अंतर्गत संघर्षामुळे भाजपमधील हेवीवेट नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केला. यामुळे खडसे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तर महाराष्ट्रात भरभक्कम असा आधार मिळाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील खडसे यांचे वर्चस्व पाहता ते भविष्यात भाजप आणि अन्य पक्षांसाठीदेखील भविष्यात तापदायक ठरू शकतात. 

याच विचाराने खडसे यांना आणि पर्यायाने राष्ट्रवादीला शह देण्याच्या दृष्टीने शिवसेनेने आपले नेते खासदार संजय राऊत यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे आणि याच जबाबदारीच्या अनुषंगाने खासदार राऊत हे पाच दिवस दौऱ्यावर आले असून, या दौऱ्यात ते प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन संघटन अधिक मजबूत करणार आहेत. यापूर्वी खासदार राऊत यांचा एवढा मोठा दौरा कधीही झालेला नाही. यामुळे पाच दिवसांच्या दौऱ्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

भाजपमध्ये संकटमोचक म्हणून समजले जाणारे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्पर्धेमध्ये शिवसेनेला भविष्यात आपले स्थान टिकवून ठेवण्याकरिता उत्तर महाराष्ट्रात तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने खा. राऊत यांनी पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी ते भाजपविरोधात आखावी लागणारी रणनीती अशा सर्व बाबींची जबाबदारी सोपविली आहे. याच धर्तीवर येत्या काळात शिवसेनेकडून उत्तर महाराष्ट्रातही पक्षीय संघटनेची फळी मजबूत करण्यात येणार आहे.