Fri, Jun 05, 2020 14:21होमपेज › Nashik › सिग्नलचे केबल तोडून शिर्डीकडे जाणार्‍या एक्सप्रेसवर दरोडा

सिग्नलचे केबल तोडून शिर्डीकडे जाणार्‍या एक्सप्रेसवर दरोडा

Published On: May 12 2018 2:02PM | Last Updated: May 12 2018 2:29PMपरभणी : प्रतिनिधी

आंध्रप्रदेशातील सिकंदराबादहून शिर्डीकडे निघालेल्या एक्सप्रेसवर परभणी-औरंगाबाद लोहमार्गावरील देवलगाव अवचार स्थानकाजवळ आज (12 मे) पहाटे 2.40 वाजण्याच्या सुमारास दरोड्याचा प्रयत्न झाला. यातील एका जखमीस जालन्याच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी शिर्डी येथे पोहोचल्यानंतर प्रवासी तक्रार नोंदवणार आहेत. या घटनेत चोरट्यांनी सिग्नलचे केबल तोडून तांत्रिक बिघाड निर्माण केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सिकंदराबाद-शिर्डी (गाडी क्र. 17002) ही साप्ताहीक रेल्वे 12 मे रोजी पहाटे 2 च्या सुमारास परभणी स्थानकावरून शिर्डीकडे निघाली. देवलगाव अवचार स्थानकाच्या अलीकडे 2 कि.मी. अंतरावर असताना सिग्नलचा लाल दिवा लागलेला पाहून चालकाने रेल्वे थांबविली. या स्थानकावर सदरील गाडीला थांबा नाही. तसेच रात्रीची वेळ असल्याने प्रवाशी झोपेत असताना अचानक गाडी थांबवून 7 ते 8 दरोडेखोरांनी दगडफेक करून प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केला.

साधारणतः 20 मिनीटे रेल्वे त्या ठिकाणी थांबविण्यात आली. दरम्यान देवलगाव स्थानकावरील रेल्वे गार्ड व पॉईंटमन यांनी गाडी नियोजीत वेळेत स्थानकावर न आल्याने अंदाज घेत स्थानकाच्या पुर्व दिशेने टॉर्च घेवून निघण्यास सुरूवात केली. त्यांना गाडीपर्यंत पोहोचायला साधारणतः 10 ते 15 मिनीटे लागली. तोपर्यंत प्रवाशीही जागे झाल्याने चोरटे पसार झाले. या घटनेत लुटमार झाल्याचे सांगण्यात आले. मात्र याबाबत शिर्डी येथे पोलिसांत तक्रार देण्यात येणार असून त्यानंतरच घटनेबद्दल सविस्तर माहिती मिळेल, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. 

नांदेडचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त पथकासह दाखल

देवलगाव अवचार येथे झालेल्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त (नांदेड) के.एम. कोंडय्या, पोलिस निरीक्षक अमित उपाध्याय, जी.आर. एफ. च्या सहाय्यक पोलिस निरीक्षक धुतराज, उपनिरीक्षक माधव वाडेकर, हेडकॉन्स्टेबल विलास डोंगरे, रघुनाथ तिडके, पठाण यांच्या पथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली. तसेच सहाय्यक सुरक्षा आयुक्त कोंडय्या यांनी सदर घटनेबाबत अप्पर पोलिस अधिक्षक विश्‍व पानसरे यांना माहिती दिली. चोरट्यांच्या शोधासाठी निरनिराळी 4 पथके पाठविण्यात आली आहेत.