Fri, May 29, 2020 10:32होमपेज › Nashik › नाशिक : तारवालानगरमध्ये रात्रीत पाच घरफोड्या

नाशिक : तारवालानगरमध्ये रात्रीत पाच घरफोड्या

Published On: May 13 2019 5:05PM | Last Updated: May 13 2019 11:06PM
पंचवटी ः वार्ताहर 

पंचवटीत घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, एकाच रात्री तब्बल पाच ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. यात सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्‍कमही लांबविण्यात आली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी लहान मुलांचे गल्लेही सोडले नाहीत. गल्ले फोडून त्यातील रकमेवरही डल्ला मारला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली जात आहे. तारवालानगर परिसरात रविवारी (दि.12) मध्यरात्रीच्या सुमारास या घरफोडीच्या घटना घडल्या.

तारवालानगर परिसरातील रुही अपार्टमेंटमधील चांदवड येथे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या प्रकाश खंडेराव आव्हाड, शिवशक्ती संकुलमधील अनिल महादू सानप, अमर अशोक बोडके, मातृछाया सोसायटीमधील सौरभ श्यामकांत जोशी आणि वृंदावन सोसायटीमधील अभिजित देसाई यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह ऐवज लंपास केला. चोरट्यांनी फ्लॅटमधील नागरिक बाहेरगावी गेल्याचे हेरून आजूबाजूच्या रहिवाशांच्या घराला कड्या लावल्या. त्यानंतर पाच फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी केली. रविवारी मध्यरात्री रुही अपार्टमेंटमधील प्रकाश खंडेराव आव्हाड यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून अंदाजे बारा तोळे सोने, काही चांदीचे दागिने आणि 11 हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. आव्हाड हे कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते.

सौरभ जोशी यांच्या घरातील रोख सहाशे रुपये लंपास केले. अभिजित देसाई यांच्या घराचे कुलूप तोडल्याचा आवाज शेजारी राहणार्‍या प्रवीण शिंदे कुटुंबीयांना लागताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. अमर  बोडके यांच्या घरातून 20 हजार रोख रक्‍कम लंपास केली. तर अनिल सानप यांच्या घरातील लहान मुलांच्या तीन गल्ल्यांवर चोरट्यांनी डल्ला मारत 25 ते 30 हजार रुपये चोरून नेले. तसेच घरातील कपाटाचे कुलूप तोडून जवळपास 43 हजार रुपयांची रोकडही चोरट्यांनी लंपास केली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. काही नागरिकांनी मध्यरात्री पोलिसांशी संपर्क साधला असता फोन आलेल्या एकाच ठिकाणी भेट देत पोलीस माघारी फिरले. मात्र, त्याच ठिकाणी अन्य तीन फ्लॅटही फोडल्याचे पोलिसांच्या सकाळी लक्षात आले. 

पंचवटीतील घरफोड्यांचा लागेना तपास

तारवालानगर परिसरातील रहिवासी अशोककुमार सुभाषचंद्र गुप्ता गावाला गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे दोन तोळे सोन्याचे दागिने आणि 50 हजार रुपये रोख रकमेसह 83 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरला. या घटनेच्या काही तासानंतरच या सहा दुकानांचे शटर तोडण्यात आले. सुजित प्रभाकर खांदवे रा. फ्लॅट न 19, शिवनेरी प्राइड, मंडलिक मळा, मखमलाबाद रोड यांच्या घरातील एक लाख 27 हजार रुपये रोख आणि सात तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने असा दोन लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला. यातील एकाही प्रकरणाचा अद्यापपर्यंत छडा लागलेला नाही.