Sat, Jul 11, 2020 19:04होमपेज › Nashik › दलित-मराठा वाद महाराष्ट्राचे कंबरडे मोडणारा

दलित-मराठा वाद महाराष्ट्राचे कंबरडे मोडणारा

Published On: Mar 03 2018 2:38PM | Last Updated: Mar 03 2018 2:38PMनाशिक : प्रतिनिधी

राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार योग्यप्रकारे काम करत असून, काही जातीयवादी शक्ती दलित-मराठा वाद निर्माण  करून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  केला. हा वाद म्हणजे महाराष्ट्राचे कंबरडे मोडणारा असून, राज्याला न परवडणारा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, भाजपावर  जातीयवादी पक्षाचा आरोप करणार्‍यांनीच 60 वर्षे जातीयवादाला खतपाणी घातल्याचे सांगत ना. आठवले यांनी काँग्रेसवर तोफ  डागली.

ना. आठवले म्हणाले, दलित आणि मराठा समाज हा राज्यात गेली अनेक वर्षे गुण्यागोविंदाने नांदत आहे. दोन्ही  समाजाला एकमेकांशिवाय पर्याय नाही. सध्या निवडणूक लढवायची म्हटली तरी मराठा समाजाला दलित बांधवांना सोबत घ्यावे  लागते. तर दलित उमेदवारांना मराठा समाजाच्या मदतीशिवाय निवडणुकीत बाजी मारता येत नाही. अशा परिस्थितीत भीमा- कोरेगावसारख्या घटनांमधून राजकारणाच्या नावाखाली दोन्ही समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका आठवले यांनी केली.

हा प्रयत्न दोन्ही पक्षांनी हाणून पाडावा, असे आवाहन त्यांनी केले. भीमा-कोरेगाव घटनेबद्दल  न्यायालयाने समिती गठीत केली आहे. समितीमार्फत चौकशी सुरू असून, तीन महिन्यात त्याचा निकाल लागेल. ही समिती  संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांची चौकशी करत असून, ते दोषी अथवा अन्य कोणी दोषी असल्यास त्यांना कठोर शिक्षा  करावी, असे आठवले यांनी सांगितले. राज्यात शांतता नांदावी यासाठी आरपीआयतर्फे राज्यभरात सामाजिक सलोखा रॅलीचे  आयोजन केले जात आहे. नगरमधील अश्‍वी येथे सामाजिक सलोखा सभा होणार असून, त्याचे निमंत्रण खासदार संभाजी राजे यांना देण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले. 

डोक्यावर गांधी टोपी परिधान करणार्‍या काँग्रेसने गेल्या 60 वर्षात जातीयवाद वाढविल्याचा आरोप करतानाच त्यांना भाजपावर जातीयवादी पक्ष म्हणणाचा अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 60 वर्षात तुमच्याकडे ग्रामपंचायतीपासून ते राज्याची तसेच केंद्रातील सत्ता होती. त्यावेळी समाजात समानता का आणू शकले  नाही, असा सवाल उपस्थित करताना सत्तेतून बाहेर असलल्या काँग्रेस व राष्ट्रवादीची परिस्थिती म्हणजे पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी झाल्याची टीका केली.  

दलित समाज भाजपाच्या पाठीशी केंद्र सरकार दलितांसाठी योजना राबवित आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी 5  हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशातील दलित जनता ही भाजपाच्या पाठीशी आहे. उत्तर प्रदेशच्या  निवडणुकीतून ते समोर आले. तेथील 24 टक्के दलित बांधवांपैकी 14 ते 15 टक्के बांधवांनी भाजपाला मतदान केले. त्यावेळी  मायावतींना केवळ 19 जागा देत नाकारल्याचे आठवले म्हणाले. तसेच 2019 मध्ये देखील भाजपाप्रणीत एनडीएचे सरकार  सत्तेत येईल, असा विश्‍वास आठवलेंनी व्यक्त केला.