Tue, May 26, 2020 11:18होमपेज › Nashik › ...तर मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर कारवाई का केली नाही? : राज ठाकरे 

...तर मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर कारवाई का केली नाही? : राज ठाकरे 

Published On: Apr 26 2019 8:50PM | Last Updated: Apr 26 2019 8:50PM
नाशिक : पुढारी ऑनलाईन 

आधीच्या सरकारच्या काळात मीच तेंव्हाच्या सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत होते. त्यावेळी सिंचन घोटाळ्यातील भ्रष्टाचारावर भाजपचे नेते घसा फोडून ओरडत होते. पण सत्तेत आल्यावर देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्यावर आरोप होते ते सुनील तटकरे आणि अजित पवारांवर का नाही कारवाई झाली? अशी विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. 

अमित शाह सांगलीत म्हणाले होते की ७२००० कोटींच्या घोटाळ्याचं काय झालं? तुम्ही सत्तेत होतात उत्तरं द्या? भाजप-शिवसेनेच्या सत्तेच्या काळात जलसिंचनाची नक्की काय कामं केली? हे कधी ते सांगणार आहेत? अशी विचारणाही त्यांनी केली. 

सत्तेत बसलेल्या पक्षाने निवडणुकीच्या आधी दिलेली आश्वासनं पूर्ण करायची असतात, पण जर तुम्हाला दिलेली आश्वासनं पूर्ण होणार नसतील तर मग तुम्ही का मतदान का करायचं? चांगलं शिक्षण, नोकरी, चांगले रस्ते, वीज, पाणी, मैदानं ह्यापलीकडे लोकांना काय हवं असतं? असे राज म्हणाले. 

राज म्हणाले, नाशिकमध्ये आम्ही सत्तेत असताना आमच्या जाहीरनाम्यात ज्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या त्यादेखील करून दाखवल्या. नाशिक हे देशातील एकमेव शहर असेल जिथे उद्योगपतींनी सीएसआरमधून पैसे खर्च करून अनेक प्रकल्प उभारायला मदत केली आणि ते देखील फक्त ५ वर्षात.  नाशिकच्या ५ वर्षाच्या सत्ताकाळात आम्ही ५१० किमीचे अंतर्गत रस्ते बांधले,वाहतूक बेटं,चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क, गोदा पार्क, बोटॅनिकल गार्डन, मा.बाळासाहेब ठाकरे स्मारक, घनकचरा प्रकल्प,जलशुद्धीकरण प्रकल्प,मलजल प्रक्रिया केंद्र, मुकणे धरणातून थेट पाईपलाईन योजना, प्रकल्प राबवले. 

राज म्हणाले, हे सर्व आम्ही ५ वर्षात करून दाखवलं. नाशिककरांनी जो द्यायचा तो निर्णय दिला. त्याचं वाईट वाटलं पण जी कामं केली ती छातीठोकपणे सांगितली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखं, नाशिक दत्तक घेतो असली खोटी आश्वासनं दिली नाही. मला सांगा दत्तक घेतलेल्या काय केलं ह्या बापाने? स्मार्ट सिटीच्या नावाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलीच कामं भाजपने आम्ही केली असं दाखवलं. ह्या बातम्या नाशिकच्या वर्तमानपत्रात आल्या होत्या. कोणत्या गोष्टींवर ह्या सरकारला मार्क द्यायचे?