Tue, Jun 02, 2020 12:36होमपेज › Nashik › विमान तिकीट काढून देण्याच्या नावाखाली कोट्यवधींना गंडा

विमान तिकीट काढून देण्याच्या नावाखाली कोट्यवधींना गंडा

Published On: Sep 14 2018 1:31AM | Last Updated: Sep 13 2018 11:36PMनाशिक : प्रतिनिधी

हज आणि उमराह येथे जाणार्‍या मुस्लिम भाविकांचे विमान तिकीट बुकिंग करून देण्याच्या मोबदल्यात 739 भाविकांकडून एक कोटी 75 लाख रुपये घेत तिकीट न काढता चौघा संशयितांनी पैशांचा अपहार करीत भाविकांसह टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलच्या संचालकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी अल खैर टुर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचे संचालक अश्पाक रमजान पठाण (32, रा. दीपालीनगर) यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात संशयित अब्दुल मतीन महमद अजीज मनियार, अजीज बनेमिया मनियार (दोघे रा. वडाळारोड), जावेद हनिफ शेख (रा. वाशी, नवी मुंबई) आणि समीर मनियार (रा. जुने नाशिक) या चौघांविरोधात अपहार, फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. 

अश्पाक पठाण यांनी त्यांच्या भागीदारांसह अल खैर टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स सुरू केले. संशयित अब्दुल याच्यासह इतर तिघांनी मिळून अश्पाक व त्यांच्या साथीदारांचा विश्‍वास संपादन केला. हज आणि उमराह येथे जाणार्‍या मुस्लिम बांधवांचे विमान तिकीट अश्पाक यांच्या टुर्समार्फत काढली जात होती. यात्रेकरूंचे तिकीट काढण्यासाठी संशयित 40 टक्के रक्कम सुरुवातीस घेत होते. तिकीट बुक झाल्यानंतर उर्वरित 60 टक्के रक्कम घेतली जात होती. त्यामुळे संशयितांवर अश्पाक व त्यांच्या साथीदारांचा विश्‍वास बसला. ऑगस्ट 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत नाशिकमधील मुस्लिम भाविकांसाठी हज आणि उमराह येथे जाण्यासाठी चौघा संशयितांच्या मदतीने विमान तिकिटे काढण्यात येत होती. चौघा संशयितांनी 739 भाविकांचे तिकीट काढण्यासाठी त्यांच्याकडून एक कोटी 75 लाख 11 हजार 338 रुपये घेतले. मात्र, चौघांनी यात्रेकरूंचे विमान तिकिटाचेे पैसे घेत तिकिटे काढलीच नाहीत. त्यामुळे यात्रेकरूंसह अश्पाक यांच्या फर्मचेही आर्थिक नुकसान झाले. अश्पाक पठाण यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत होत असून, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर तपास करीत आहेत.