Tue, Jun 02, 2020 23:46होमपेज › Nashik › रेल्वेत लूटमार करणारे दहा जण ताब्यात

रेल्वेत लूटमार करणारे दहा जण ताब्यात

Published On: Apr 21 2018 1:03AM | Last Updated: Apr 20 2018 11:24PMमनमाड : वार्ताहर

धावत्या रेल्वेत प्रवाशांना मारझोड करून वेगवेगळ्या ठिकाणी लुटणार्‍या व पाकीट मारणार्‍या 10 चोरट्यांना पकडण्यात रेल्वे सुरक्षा बलाला (आरपीएफ) यश मिळाले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाइल आणि इतर साहित्य जप्‍त करण्यात आले आहे.

आरपीएफचे सुरक्षा आयुक्‍त अजय दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निरीक्षक के. डी. मोरे यांच्या नेतृत्वाखाली अश्‍विनी पटेल, ए. एन. देवरे, एल. आर. अलगुडे, शिवानंद गिते, सुरेंद्र कुमार, समाधान गांगुर्डे, डी. के. तिवारी, बी. ए. पाटील, नितीन तुपाके आदींनी चोरट्यांना पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

1 बंगळूरूकडून दिल्लीकडे जाणार्‍या कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये दौंड-अहमदनगर दरम्यान जनरल डब्यात बसलेल्या सहा तरुणांनी वाशांना मारझोड करत लुटण्यास सुरुवात केली होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही प्रवाशांनी धाडस करून चोरट्यांचा प्रतिकार करत त्यांना पकडून चोप देण्यास सुरुवात केली. आपला डाव उलटल्याचे पाहून सहा पैकी दोन चोरटे फरार झाले, तर चार चोरट्यांना प्रवाशांनी पकडून ठेवले. घटनेची माहिती आरपीएफ अधिकार्‍यांना दिल्यानंतर गाडी मनमाड स्थानकावर येताच सोमनाथ साळवे, सादिक शेख, ज्ञानदेव सोनटक्के आणि प्रभू वर्डिले यांना आरपीएफच्या जवानांनी ताब्यात घेतले.

2 दिल्लीकडून बंगळूरूकडे जाणार्‍या कर्नाटक एक्स्प्रेसमध्येच तीन चोरटे धुमाकूळ घालत असल्याची माहिती मिळताच आरपीएफच्या जवानांनी गाडीकडे धाव घेतली.  आरिफ तंबोळी, देवानंद महाजन  आणि  शाहरुख पठाण या तिघांना पकडले. 

3 मुंबईकडे जाणार्‍या कामयानी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांचे पाकीट मारताना  मोहम्मद युनूस याला आरपीएफच्या जवानांनी रंगेहाथ पकडले.

4 शालीमार एक्स्प्रेसमध्ये मनमाड-लासलगाव दरम्यान घडली. धावत्या गाडीत प्रवाशांना धाक दाखवून लुटणार्‍या दोन जणांना आरपीएफच्या जवानांनी पकडले. 

 

Tags : nashik, Manmad news, crime, railway robbery, ten people arrested,