Tue, May 26, 2020 11:06होमपेज › Nashik › छाप्यात आठ लाखांचा मुद्देमाल जप्‍त

छाप्यात आठ लाखांचा मुद्देमाल जप्‍त

Published On: Apr 09 2019 2:00AM | Last Updated: Apr 08 2019 11:26PM
मालेगाव : प्रतिनिधी

विशेष पोलीस पथकाने रविवारी मध्यरात्री सटाणा नाका भागातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून एक लाख 90 हजारांच्या रोकडसह सुमारे आठ लाखांचे मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी भाजपा माजी महानगराध्यक्षासह 25 जणांवर छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सटाणा नाका भागात जुगार खेळविला जात असल्याची खबर अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशान्वये विशेष पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास एकता जिमखान्यालगतच्या गोडावूनमध्ये छापा टाकला. याठिकाणी जुनेद अहमद रफीक, शेख सईद शेख बशीर, मनोज रमेश शेलार, सय्यद लाल सैयद नबी, बापू गुलाब खैरनार, मोहन हरी पवार, संजय कैलास गंगावणे, राकेश आनंदा शिंदे (मॅनेजर), प्रकाश तुकाराम पाटील, रोहिदास अशोक लोंढे, राजेंद्र शंकर यशोद, अनिल तुकाराम पगार, अनिल बाबुलाल गायकवाड, दत्तात्रय चिलू अमृतकर, शेख शारिब शेख अब्बास, अखिल शहा सरदार, मोहम्मद शाबान  गुलाल, शेख अनिस शेख रशीद, अनिल बालकृष्ण पिंगळे, प्रशांत कलाचंद भावसार, नंदू रामदास पाटील, किशोर अशोक जाधव, सुभाष यशवंत आहिरे, अजिज नूर मोहम्मद हे तीन पत्ती जुगार खेळताना मिळून आले. जुगारातील एक लाख 90 हजार 390 रुपये रोख, दहा दुचाकी, 25 मोबाइल, एक रिक्षा असा सुमारे सात लाख 82 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही जागा भाजपाचे माजी महानगराध्यक्ष सुनील गायकवाड यांची असल्याचे सांगण्यात आल्याने त्यांच्यासह 25 जणांविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पहाटे उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

राजकीय षडयंत्राचा बळी : गायकवाड

या पोलीस कारवाईचे भाजपा गटनेते सुनील गायकवाड यांनी स्वागत केले. परंतु, सदरची जागा आणि त्याठिकाणी सुरू असलेल्या प्रकाराशी आपला दुरान्वये संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षीय प्रचारासाठी बाहेरगावी असताना ही कारवाई झाली. त्यानंतरही राजकीय षडयंत्रातून याप्रकरणी नाव गोवण्यात आल्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे. सदरची जागा त्यांच्या नातेवाईकाची असली तरी काही दशकांपासून ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाला भाडेतत्त्वावर देण्यात आली असल्याचाही खुलासा त्यांनी केला आहे.