Wed, Jun 03, 2020 21:42होमपेज › Nashik › अनधिकृत दवाखान्यावर छापा

अनधिकृत दवाखान्यावर छापा

Published On: Apr 10 2019 2:01AM | Last Updated: Apr 09 2019 11:09PM
सटाणा : वार्ताहर

येथून जवळच असलेल्या आराई येथे ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारीनुसार मंगळवारी (दि.9) दुपारी तालुकास्तरीय समितीने अचानक छापा मारून अनधिकृत व विनापरवाना दवाखान्यावर कारवाई केली. समितीने आक्षेपार्ह औषधे, साहित्य व कागदपत्रे ताब्यात घेत पंचनामा केला असून, विद्यापीठाच्या अभिप्रायानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

येथून जवळच असलेल्या आराई येथे एन. टी. गोसावी काही वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करीत होते. त्यांच्याकडे औषधोपचार घेतलेल्या गावातील एका रुग्णाला रिअ‍ॅक्शन झाल्याने ग्रामपंचायत सदस्य राहुल आहिरे व धीरज सोनवणे यांनी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडे याबाबत लेखी तक्रार केली होती. याबाबत त्यांनी मंगळवारी (दि.9) ग्रामविकास अधिकारी एस. बी. भामरे यांना विचारणा करून तालुकास्तरीय समितीस पाचारण करण्याची मागणी केली. त्यानुसार भामरे यांनी माहिती देताच तालुका गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव यांनी दुपारी अचानक गोसावी यांच्या दवाखान्यात छापा मारला. यावेळी समितीला गोसावी यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठीचे कुठलेही शासनमान्य प्रमाणपत्र प्राथमिकद‍ृष्ट्या आढळले नाही. त्यांच्याकडे प्रमाणपत्रांची मागणी केली असता इलेक्ट्रोपॅथीचे प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र, त्यांच्याकडे अ‍ॅलोपॅथीची औषधे व इंजेक्शन मिळून आले. 

त्यांच्या खरेदीचे बिल आणि रेकॉर्डही अनुपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. इंजेक्शन व इतर जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी  शासकीय मार्गदर्शक सूचनांची कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे आढळून आले. त्याबाबतचे प्रमाणपत्रही आढळून आले नाही. समितीने छापा मारला त्यावेळी दवाखान्यात लहानू लांडगे (रा. देवळाणे) हे रुग्ण उपस्थित होते. त्यांना गोसावी यांनी अँटिबायोटिक गोळ्या दिल्याचे आढळून आले. वैद्यकीय व्यवसायासाठी ग्रामपंचायतीचे परवानगी प्रमाणपत्रही त्यांनी घेतले नसल्याचे सांगितले. 

समितीने यावेळी संबंधित औषधांचे नमुने व साहित्य तसेच कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. गोसावी यांनी उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रांची विद्यापीठाकडून पडताळणी करण्यात येणार असून, विद्यापीठाच्या अभिप्रायानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शहराजवळच जवळच असलेल्या गावात वैद्यकीय समितीच्या पाहणीत अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय आढळून आल्याने खळबळ माजली आहे.तालुक्यातील इतर गावांतही याच पद्धतीने अनधिकृतरीत्या वैद्यकीय व्यवसाय थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळ होत असल्याने याबाबत ग्रामपंचायतीने सक्तीने कार्यवाही करावी.
- जितेंद्र देवरे, 
गटविकास अधिकारी, सटाणा