Tue, Nov 19, 2019 13:26होमपेज › Nashik › नाशिकमधून किसान लाँग मार्चला सुरुवात(Live)

नाशिकमधून किसान लाँग मार्चला सुरुवात(Live)

Published On: Feb 21 2019 1:30AM | Last Updated: Feb 21 2019 11:47AM
नाशिक : प्रतिनिधी 

विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या लाँग मार्चला आज (ता. २१) नाशिकमधून  सुरुवात झाली. हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले असून मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला. माजी खा.  समीर भुजबळ, अजित नवले, आमदार जे. पी. गावीत,  विष्णु म्हैसधुसने यांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला.नदीजोड प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती द्यावी, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देऊ नये, वनहक्कांच्या जमिनींचे दावे निकाली काढावे आदी विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार होता. परंतु, रात्री उशिरापर्यंत पालकमंत्री गिरीश महाजन आणि किसान सभेच्या पदाधिकार्‍यांच्या चर्चेनंतर नाशिकहून मोर्चा कधी निघेल हे ठरणार आहे. दि.27 रोजी हा लाँग मार्च मुंबईत धडकणार आहे. महामार्ग बसस्थानकावर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक, पेठ, सुरगाणा, हरसूलसह मराठवाड्यातील सुमारे 25 हजारांहून अधिक आंदोलक उपस्थित होते. 

जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडे पावसाचे वाया जाणार्‍या सुमारे 200 टीएमसी पाण्याची साठवणूक करण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात, जिल्ह्यात अद्यापही सुमारे 11 हजार वनजमिनींचे दावे शासनाने तत्काळ निकाली काढावे, महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला न देता महाराष्ट्रातील दुष्काळी गावांना मिळावे, वृद्धपकाळ पेन्शन योजनेची रक्कम 600 रुपयांहून दोन हजार रुपये करावी, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत सर्वांचाच समावेश करावा, रेशनकार्ड बनविण्यासाठी आदिवासी गोरगरिबांना येणार्‍या अडचणी तत्काळ दूर कराव्यात आदी प्रमुख मागण्या आहेत. 

 

गेल्यावर्षी काढलेल्या लाँग मार्चनंतर शासनाने फक्त वनजमिनींचे काही दावे निकाली काढले आहेत. उर्वरित मागण्या मात्र अद्याप ‘जैसे थे’आहेत. 23 हजार वनहक्क जमिनींच्या दाव्यांपैकी 12 हजार दावे निकाली काढले आहेत. परंतु 11 वनजमिनींचे दावे अद्यापही प्रलंबित आहेत. नाशिक वगळता इतर जिल्ह्यात वनजमिनींच्या प्रलंबित दाव्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे लाँग मार्चनंतरही मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. याप्रसंगी किसान सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद मुल्ला, आमदार जिवा पांडू गावित, किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे, जनरल सेक्रेटरी डॉ. अजित नवले, रतन बुधर (ठाणे), किसन गुजर, डॉ. डी. एल. कराड, माजी आमदार नितीन भोसले, राजू देसले, सुनील मालुसरे, सुभाष चौधरी यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, माजी खासदार समीर भुजबळ यांनी आंदोलकांशी भेट घेऊन चर्चा केली.

पोलिसांचा बंदोबस्तही ‘लाँग’ 

लाँग मार्चसाठी जिल्हाभरातून हजारो आदिवासी  मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकावर दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत मोर्चेकरी तेथेच तळ ठोकून असल्याने पोलिसांचा बंदोबस्तही लांबला आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि वाहतूक शाखेचे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. लाँग मार्चसाठी जिल्ह्यातून आलेले मोर्चेकरी बुधवारी (दि.20) सायंकाळी सहाला मुंबईला रवाना होणार होते. त्यादृष्टीने शहर पोलिसांनी बंदोबस्त आणि वाहतुकीचे नियोजन केले होते. मात्र, मोर्चेकर्‍यांनी महामार्ग बसस्थानकावर तळ ठोकला.

नाशिकमधून किसान लाँग मार्चला सुरुवात(Live)

माजी खासदार समीर भुजबळ  मोर्चात सहभागी

मोर्चा वाडीवऱ्हे येथे दुपारच्या जेवणासठी थांबणार आहे. तोपर्यंत  निर्णय होण्याची माहिती सुत्रानी  दिली आहे.

मोर्चाचे  नेतेही सरकारच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत. 

लेखी  आश्वासन मिळाल्यास मुंबईकडे जाणारा मोर्चा रस्त्यात स्थगित केला जाऊ शकतो.

गुजरातचे पाणी आडवा, संपुर्ण कर्ज मुक्ती झाली पाहिजे,  सातबारा कोरा झाला पाहिजे,  वन हक्क कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे,  स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे आदी घोषणा देत मुब ई नाका येथुन किसान लाँग मार्च मुबई च्या दिक्षेने रवाना झाला.